मुंबई : राज्याच्या राजकीय विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या राजभवनात आज (मंगळवारी) सकाळी शपथविधीचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता होणार असून यावेळी छगन भुजबळ हे आपल्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितलं जातंय. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चेमध्ये अखेर मंत्रिपदाची माळ छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडली आहे. मात्र आता त्यांना मंत्रिपद दिल्याने ही नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आले असल्याचे बोलले जात आहे.
असे असलं तरी छगन भुजबळ यांच्या एन्ट्रीने नाशिकच्या पालकमंत्री पदाची स्पर्धा आणखी वाढणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. सरकार स्थापनेला 100 दिवस उलटून गेलेत तरीही रायगड आणि नाशिक जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री ठरलेला नाही. त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्याप कायम असून या ठिकाणी कुणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नव्या ट्विस्टमुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाची स्पर्धा आणखी वाढणार
दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा होऊन ही त्यांची नियुक्ती थांबविण्यात आली आहे. तर तिकडे शिवसेनेचे नेते दादा भुसे आणि भाजप नेते गिरीश महाजन हे दोघेही दिग्गज नेते पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असून ते प्रबळ दावेदार देखील मानले जात आहे. मात्र असे असताना छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एन्ट्री झाल्याने पालकमंत्री पदाचा ट्विस्ट आणखी वाढला आहे. भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने नाशिक जिल्ह्याला आता चार मंत्रिपद मिळाले असून 3 राष्ट्रवादी काँग्रेस तर एक शिवसेनाकडे आहे. दरम्यान, आगामी कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
धनंजय मुंडेंचे खाते छगन भुजबळांकडे
राज्यासह देशभरात गाजत असलेल्या बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खात्याचे पद रिक्त होतं. अशातच ही जबाबदारी नेमकी कुणाच्या खांद्यावर पडणार याकडे साऱ्यांच्या नजारा लागून होत्या. अशातच आता तेच खातं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
हे ही वाचा