Sameer Bhujbal, Nandgaon Assembly Constituency : नाशिक : गेल्या दोन ते अडीच वर्षात राज्यानं अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवला आहे. राज्यातील दोन मोठे पक्ष, शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) उभी फूट पडली आणि राज्यातील राजकारणात भूकंप झाला. अशातच पक्षांतर्गत फुटीनंतरची यंदाची पहिलीच विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) असल्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. अशातच राज्यानं एक काका पुतण्यातील बंड पाहिला आहे, अशातच यंदाच्या विधानसभेत राज्याला पुन्हा एकदा काका-पुतण्यातील संघर्ष पाहायला मिळू शकतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना त्यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) मोठा धक्का देऊ शकतात, अशी चिन्ह दिसत आहेत. 


मंत्री छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी यापूर्वीच शड्डू ठोकला असून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे महायुतीकडून संधी मिळण्याची चिन्ह न दिसल्यामुळे आता माजी खासदार समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातून लढण्यासाठी समीर भुजबळ इच्छुक असल्याचीही माहिती मिळत आहे. 


नांदगाववरुन महायुतीत बिनसणार? 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगावच्या राजकीय वर्तुळासोबतच महायुतीतही खळबळ माजली आहे. समीर भुजबळ यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे शिंदे गट भुजबळांसाठी जागा सोडणार? की, समीर भुजबळ अपक्ष लढणार किंवा महाविकास आघाडीचा पर्याय निवडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


ठाकरे आणि शरद पवार गटाचे नेते समीर भुजबळांच्या संपर्कात : सूत्र 


समीर भुजबळ सध्या महायुतीकडून उमेदवारी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या सुहास कांदे हे महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. मात्र, समीर भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. उमेदवारी न मिळाल्यास भुजबळ इतर पर्यायांचा विचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या अपक्ष किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढता येईल का? याची देखील चाचपणी भुजबळ यांच्याकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे नेतेही समीर भुजबळांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sameer Bhujbal : नांदगावच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी? समीर भुजबळांनी विधानसभेसाठी ठोकला शड्डू, शिंदे गट माघार घेणार?