नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सध्या जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. त्यातच आता नांदगाव विधानसभा मतदारसंघावरून (Nandgaon Assembly Constituency) महायुतीत वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) नांदगाव मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. 


आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, असा सामना रंगणार आहे. त्यातच आता महायुती आणि महाविकास आघाडीमधील अंतर्गत पक्षांमध्ये कुरबुरी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी समाजमाध्यमांवर माजी खासदार समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, 'नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जा', अशी पोस्ट केली होती. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. 


समीर भुजबळ निवडणुकीसाठी इच्छुक


आता महायुतीत नांदगाव विधानसभा मतदारसंघावरून वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून नांदगाव विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महायुतीत सध्या ही जागा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडे आहे. सुहास कांदे (Suhas Kande) हे सध्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तर राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) विधानपरिषदेवर गेल्यावर समीर भुजबळ माघार घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र समीर भुजबळ यांनी माघार न घेता पक्षाकडे नांदगाव विधानसभेची जागा घ्यावी, अशी विनंती केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे सुहास कांदेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


नांदगावमधून कुणाला उमेदवारी? 


दरम्यान, नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघामधून शिवसेनेचे (Shiv Sena) सुहास कांदे आमदार आहेत. कांदे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. या मतदारसंघातून पूर्वी पंकज भुजबळ निवडून आले होते. 2019 च्या निवडणुकीत पंकज भुजबळ यांचा सुहास कांदे यांनी पराभव केला होता. आता समीर भुजबळ (Sameer Bhujbal) नांदगाव मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने त्या दृष्टीने विविध कार्यक्रम घेत आहेत. आता नांदगावमधून नक्की कुणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Maharashtra Assembly Elections 2024 : भावासाठी आमदारकीचा त्याग... चांदवड-देवळा विधानसभेतून आमदार राहुल आहेर यांची माघार


Chhagan Bhujbal: राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांदरम्यान भुजबळांचं विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले....