छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी यांचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. पुढच्या काही दिवसांत दोन्ही आघाड्या याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. यावेळच्या निवडणुकीत मराठवाड्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. कारण या निवडणुकीआधी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणाच्या रुपात संपूर्ण मराठा मतदार एका छताखाली आणला आहे. मराठा समजाची भूमिका सोईची ठरल्यास सत्तेचं सिंहासन मिळवण्यास अडचणी येणार नाहीत. मात्र मनोज जरांगे यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. असे असताना जरांगे यांनी काल (19 ऑक्टोबर) मुस्लीम धर्मगुरुशी चर्चा केली आहे.
जरांगे आणि सज्जाद नोमानी यांच्यात दोन तास चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन 19 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा मुस्लिम धर्मगुरू तथा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि अनेक इस्लामिक पुस्तकांचे लेखक असलेले सज्जाद नोमानी यांची भेट घेतली. या द्वयीमध्ये तब्बल दोन तास झाली चर्चा झाली आहे. जरांगे आज म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. थेट निवडणुकीत सहभागी व्हायचे की पाडापाडीचे राजकारण करायचे? हे आज जरांगे सांगणार आहेत. त्याआधी जरांगे यांनी मुस्लीम धर्मगुरूशी केलेल्या या चर्चेला चांगलेच महत्त्व आहे.
मुस्लीम धर्मगुरू यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला
जरांगे यांनी या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. बसल्यावर वेगवेगळ्या चर्चा होणारच. राजकीय, सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाली. सज्जाद नोमानी हे ज्येष्ठ व्यक्ती आहेत. त्यांच्या समजात त्यांचे एक वेगळे वजन आहे. अशा माणसाला भेटायला गेल्यानंतर त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजेत. त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांना दोन-तीन दिवसांचा वेळ हवा आहे. दोन-तीन दिवसांत ते काय निर्णय घेणार हे लक्षात येईल. त्यांचे राज्यभरातील धर्मगुरी आहेत. त्यांच्याशी चर्चा करून ते कळवतील. एक वेगळं समीकरण उभं राहिलं पाहिजे. त्यानंतरच सर्वसामान्यांना न्याय मिळू शकतो, अशा भावना जरांगे यांनी व्यक्त केल्या
माणुसकी जिवंत ठेवून एकत्र यायला हवं
दोघांमधील चर्चा सकारात्मक होती. आपण गोरगरीबांसाठी काम करत आहोत, हे जाणून ते समाधानी आहेत. धर्मपरिवर्तन, सत्तापरिवर्तनासाठी आपण एकत्र आलेलो नाहीत, ही गोष्ट त्यांना मान्य आहे. गोरगरीब, दलित, शेतकऱ्यांना, गोरगरीब मुस्लिमांना न्याय द्यायचा असेल तर माणुसकी जिंवत ठेवून एकत्र यायला हवं. प्रत्येकाला भेटण्याचा, एकत्र येण्याचा अधिकार आहे. आपलं भविष्य आजमावण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, हाच प्रयत्न आम्ही करत आहोत, असे जरांगे यांनी सांगितले.
जरांगे आणि राजकीय तज्ज्ञ, अभ्यासकांची भेट
दरम्यान, याआधी जरांगे यांनी अनेक राजकीय तज्ज्ञ, अभ्यासक आणि वकिलांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत सध्याचे राजकारण तसेच त्यांच्या भविष्यातील भूमिका यावर चर्चा झाली. बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून ते लोकसभेप्रमाणे यावेळी देखील पाडापाडीचीच भूमिका घेऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणुकीत उभे राहूनच विजय मिळावावा, असं काही नसतं. पाडण्यातसुद्धा विजय आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जरांगे नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :