सातारा : लोकसभा निवडणुकांचा 5 टप्पा 20 मे रोजी देशभरात पार पडला. यासह महाराष्ट्रातील 18 व्या लोकसभा निवडणुकांची (Loksabha) रणधुमाळी संपुष्टात आली. तत्पूर्वी दोन दिवसांपूर्वीच निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची मुंबईत सांगता सभा झाली. तर, बीकेसीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल, शरद पवार यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. त्यानंतर, महाराष्ट्रातील बडे नेते काही प्रमाणात रिलॅक्स झाले आहेत. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यंदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त सभा घेत प्रचारात योगदानं दिलं. तब्बल 115 सभा घेत फडणवीसांनी महाराष्ट्र फिरला, तर भाजपचे इतरही नेते आपल्या-आपल्या भागात प्रचार करत होते. राज्याचे मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हेही गेल्या 2 महिन्यांपासून प्रचारात व्यस्त होते. मात्र, राज्यातील निवडणुकांची सांगता होताच, ते कुटुंबासमवेत महाबळेश्वरच्या दौऱ्यावर गेले आहेत. 


कडाक्याच्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळावा, थंड हवेच्या ठिकाणी निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा म्हणून पर्यटकांची महाबळेश्वरमध्ये मोठी गर्दी झाली आहे. त्यातच, निवडणुकांच्या गरमा-गरमीतून बाहेर पडल्यानंतर आता नेतेमंडळीही पर्यटन व कुटुंबासोबत फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करताना दिसून येत आहेत. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पत्नीसमवेत महाबळेश्वर गाठून येथील हिरव्यागार निसर्गाचा व कडाक्याच्या उन्हात मिळणाऱ्या अल्हाददायक गारव्याचा मनमुराद आनंद घेतला. 


सध्या महाबळेश्वर हाऊसफुल झाल्याचं चित्र आहे. अवकाळीमुळे राज्यातील तापमान काहीसे कमी झाले असले तरी, अद्यापही उन्हाळ्याच्या झळा बसत आहेत. मात्र, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या महाबळेश्वर परिसरात चक्क धुक्यांचे लोट वाऱ्याच्या वेगाने पळताना पहायला मिळत आहेत. त्यामुळे, पर्यटकांनी साताऱ्याच्या जावळी खोऱ्यात सहकुटुंब धाव घेतल्याचं दिसून येत आहे. त्यातच, निवडणूक काळात आरोप-प्रत्यारोपांनी तापलेल्या गरमा गरमीच्या वातावरणातून बाहेर पडताच भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांनीही चक्क पत्नी समवेत महाबळेश्वर गाठलं आहे. सह्याद्रीच्या कुशीत ते फिरायला आले आले असून येथील दुकानात खरेदी करण्यात मग्न असल्याचं दिसून आलं. महाबळेश्वरमध्ये ते एका चप्पलच्या दुकानात पत्नीसाठी लेदरची चप्पल घेत होते, त्यावेळी, दुकानदारांनी आपुलकीने त्यांचे स्वागत केले. त्यांचे महाबळेश्वर भेटीचे हे चित्र आता व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे, निवडणुकांच्या धामधुमीतून निवांत झालेले भाजपचे दादा पत्नीसमवेत महाबळेश्वरची ट्रीप एन्जॉय करत आहेत. 


देवेंद्र फडणवीस दिल्लीत


दरम्यान, राज्यातल्या निवडणुका संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता उर्वरीत राज्यातील प्रचारात व्यस्त झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे दौरा केल्यानंतर ते दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ते पुढील दोन दिवस दिल्लीत असणार आहेत. उद्या आणि परवा देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीत सभा होणार असून देशाच्या राजधानी त्यांचा रोड शो देखील आयोजित करण्यात आला आहे.