Yugendra Pawar, Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोकसभा निवडणूकीत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना मैदानात उतरवले. अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतली. मात्र, पवार कुटुंबातील बहुसंख्य लोक शरद पवारांच्या पाठिशी उभे राहिले. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार थेट सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरले. त्यांनी अजित पवारांवर टीका करतानाही मागेपुढे बघितले नाही. दरम्यान, आता युगेंद्र पवार (Yugendra Pawar) बारामतीत जनता दरबार घेत राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे ते विधानसभा निवडणूक लढणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. यावर आता युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी देखील भाष्य केलं आहे. 


युगेंद्र पवार म्हणाले? 


पाण्याचे विषय आहेत, अॅडमिशनचा विषय आहे, त्यासाठी मी आज इथे आलोय. वादळामुळे घराचे छत गेली आहेत. अनेक विषय आहेत. मी याला जनता दरबार म्हणत नाही. आपल लोकांशी डायलॉग आणि सुसंवाद ठेवलाय. वादळामुळे नुकसान झालं त्या लोकांना घरी जाऊन मदत करतोय. ज्या पद्धतीने मदत करता येईल, ते करतोय. 


विधानसभेबाबत काय म्हणाले युगेंद्र पवार ?


दरवेळी मला विधानसभेबाबत प्रश्न विचारला जातोय. दरवेळेला मी एकच उत्तर दिलं आहे. मी विधानसभेबाबत विचार केलेला नाही. मला त्याबाबत विचार करु द्या. मी लोकांची कामे करतोय. मला लोकांची काम करु द्या. विधानसभेला अजून वेळ आहे. मीडियानेच माझ्याबाबत चर्चा सुरु केले आहे, असे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी स्पष्ट केले आहे. 


युगेंद्र पवारांकडे सध्या कोणत्या जबाबदाऱ्या?


युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आहेत. तर अजित पवारांचे पुतणे आहेत. बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद सध्या त्यांच्याकडे आहे. विद्या प्रतिष्ठाणचे खजिनदारपदही युगेंद्र पवार यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी त्यांच्या कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरुन टीका देखील केली होती.  युगेंद्र पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी जीवाचं रान केलं. सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळे या देखील युगेंद्र पवारांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करताना दिसल्या होत्या. 


Yugendra Pawar Baramati : युगेंद्र पवार मतदानानंतर अॅक्शन मोडवर;दर मंगळवारी बारामतीकरांसाठी हजर राहणार