Chandrakant Patil and Gaja Marane, पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्याचे गुंडांसोबत फोटो पाहायला मिळाले आहेत. शिवाय अनेक राजकारणी मंडळींनी कुख्यात गुंडांकडून सत्कारही स्वीकारले आहेत. काही महिन्यांपूर्वी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marane) यांच्याकडून सत्कार स्वीकारला होता. त्यानंतर लंकेंवर टीका झाल्यानंतर गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नसल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान आता भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही गजा मारणेकडून सत्कार स्वीकारला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांवरही विरोधकांकडून टीका केली जाण्याची शक्यता आहे. 


चंद्रकांत पाटलांची कोथरूडमधून निवडणूक लढविण्यासाठी तयारी 


कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंगळवारी (दि.28) झालेल्या दही हंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. गजानन मारणे हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास असून चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरूडमधून निवडणूक लढविण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे. त्यामुळेच त्यांनी गजा मारण्याकडून सत्कार स्वीकारल्याची चर्चा आहे. दरम्यान, आता चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)याबाबत काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


कोण आहे गजा मारणे?  (Who Is Gaja Marne) 


अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात कुख्यात गुंड गजा मारणेला अटक करण्यात आली होती. तो 3 वर्ष येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.तो आता मारणे टोळीचा म्होरक्या असल्याचे बोलले जाते. या टोळीवर 23 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गजा मारणेवर सहापेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला होता. 


पार्थ पवारांनीही घेतली होती गजा मारणेची भेट 


या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर पार्थ पवार यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. 


 निलेश लंके काय म्हणाले होते? 


गजा मारणेच्या भेटीनंतर निलेश लंके म्हणाले होते की, गजा मारणे याच्याशी झालेली भेट ही केवळ अपघात होता. मला गजा मारणे यांची पार्श्वभूमी माहिती नव्हती.




इतर महत्वाच्या बातम्या 


Avinash Bhosale : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा, सीबीआय पाठोपाठ ईडीनं नोंदवलेल्या प्रकरणातही जामीन मंजूर