Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या औरंगाबाद दौऱ्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कारण जिल्ह्यातील शिंदे गटाच्या दोन्ही मंत्र्यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे हजेरी लावणार आहे. दरम्यान सिल्लोड येथील आदित्य यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली असतानाच, औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या मतदारसंघातील शेतकरी संवाद मेळाव्याला देखील पोलिसांनी 'ग्रीन सिग्नल' दिला आहे. पैठणच्या बालानगर येथे होणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी (Aurangabad Rural Police) दिली आहे. 


आदित्य ठाकरे 7 नोव्हेंबरला सिल्लोड येथील आंबेडकर चौकात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरला पैठण तालुक्यातील बालानगर या गावात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्यक्रमासाठी स्टेज आणि लाऊडस्पीकरची परवानगी उद्धव ठाकरे गटाचे पैठण तालुकाप्रमुख मनोज पेरे यांनी पैठण एमआयडीसी पोलिसांकडे मागीतीली होती. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आल्याची माहिती पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रमुख भागवत नागरगोजे यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना दिली आहे. 


असा असणार आदित्य ठाकरेंचा पैठण दौरा...


सिल्लोड येथील दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी पैठणचा दौरा करणार आहे. ज्यात ते औरंगाबाद येथून बिडकीन, निलजगावमार्गे-पोरगावहून डोणगावला जाणार आहे. डोणगाव येथील शेतकरी भागचंद उद्धव राठोड यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहे. पुढे बालानगर या गावातील बस स्थानक परिसरातील खंडोबा मंदिराजवळ स्टेज उभारण्यात आला असून, तिथे आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे जालन्याच्या दिशीने रवाना होणार आहे. 


भुमरेंच्या मतदारसंघातील आदित्य ठाकरेंचा दुसरा दौरा...


शिंदे गटात सामील होणारे संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात यापूर्वी देखील आदित्य ठाकरे यांनी दौरा केला होता. भुमरे यांच्या मतदारसंघातील बिडकीन येथे काढण्यात आलेल्या शिवसंवाद यात्रेतून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता. यावेळी आदित्य ठाकरेंच्या रॅलीला मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा आदित्य ठकारे भुमरे यांच्या मतदारसंघात येणार आहे. त्यामुळे यावेळी आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार याचीच चर्चा स्थानिक पातळीवर सुरु आहे.  


Aaditya Thackeray: सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरेंची सभा होणार नाही, चुकून परवानगी मागितली; दानवेंचा खुलासा