नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमताने व मोठ्या संख्याबळाने स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. त्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री व 3 राज्यमंत्र्‍यांचा शपथविधी संपन्न झाला. मात्र, राज्यातील सत्ताबदलानंतर विधिमंडळातील गणितंही बदलली आहेत. भाजपने (BJP) 132 जागांवर विजय मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान पटकावला आहे. त्यामुळे, विधानसभा अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा भाजपच्या गळ्यात पडली. आता, विधानपरिषदेच्या सभापतींच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे यांनाच पुन्हा सभापतीपदाची संधी मिळेल, असा विश्वास शिवसेना नेत्यांना आहे. मात्र, भाजपकडून राम शिंदे (Ram Shinde) यांना संधी देण्यात येणार असल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राम शिंदे हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाले आहेत.  


फडणवीस सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या रणधुमाळीत सध्या विधान परिषदेच्या सभापती निवडीची लगबग पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आता विधानपरिषद सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वानाच आहे.  सध्या राज सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यातच विधानपरिषदेच्या सभापतीच्या निवडीचा मुहूर्त पार पडणार आहे. सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. तर, सभापती पद रिक्त आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या सभापतींची देखील लवकरच निवड केली जाणार आहे. भाजपकडून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. विधानपरिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे, भाजपकडून उद्या सकाळी राम शिंदे अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे, भाजपकडून राम शिंदे यांचं पुनर्वसन करण्यात येत असल्याचे दिसून येते. 




राष्ट्रवादीकडून मुख्य प्रतोद व प्रतोद पदाच्या निवडी 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी चेतन तुपे यांची निवड होण्याची शक्यता आहे. तर प्रतोदपदी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांची घोषणा केली जाऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे या दोन्ही आमदारांची नावे पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 


राज्याला विरोधी पक्षनेताच नाही


दरम्यान, महायुतीला तब्बल 237 जागांवर यश मिळाल्याने राज्यात विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवडच झाली नाही. राज्यातील कुठल्याच विरोधी पक्षाकडे 1/10 संख्याबळ म्हणजेच 29 आमदारांचे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेतेपदही विरोधकांना मिळेल की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यात, विरोधी पक्षनेतेपदाचा कुठलाही प्रस्ताव सध्या नाही. विशेष म्हणजे आज झालेल्या ठाकरे आणि फडणवीस तसेच ठाकरे आणि नार्वेकरांच्या भेटीमध्ये विरोधी पक्षनेते पदाची चर्चा झालीच नसल्याचे समजते.  


हेही वाचा


Video: बुके देऊन उद्धव ठाकरे निघाले, फडणवीस म्हणाले या बसा; नागपुरातील भेटीत नेमकं काय घडलं?