नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज नागपूरला भेट दिली. त्यावेळी, आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्याती महायुती सरकारवर आणि महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील टीका केली. त्यामुळे, अधिवेशनात उद्धव ठाकरेंचे आमदार झंझावात दाखवणार असे संकेतच त्यांनी दिले होते. मात्र, काही वेळातच उद्धव ठाकरे हे पुत्र आदित्य आणि काही आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्यांच्या दालनात पोहोचले. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करण्यासाठी ही सदिच्छा भेट होती. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील ठाकरे पिता-पुत्रांनी भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
उद्धव ठाकरे आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात पोहोचले. आपल्या हातातील बुके देऊन फडणवीसांचे अभिनंदनही केले. त्यानंतर, हात जोडून ते निघाले असता देवेंद्र फडणवीसांनी या बसा.. असे म्हणत बसण्याचा आग्रह केला. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी देखील खाली बसून त्यांच्यासोबत 6 ते 7 मिनिटे चर्चा केली. या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये, सोप्यावर बसून दोन्ही नेते चर्चा करताना दिसत आहेत. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनस्थळी आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती दिसून आली. त्यामुळे, ठाकरे-फडणवीस भेटीने शिंदे व अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
दरम्यान, ही सदिच्छा भेट होती, दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करण्यासाठीची ही भेट होती, असे सांगण्यात आले. ही केवळ सदिच्छा भेट होती, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकलीय. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची काम होतील अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसं आल ते आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले.
राजकीय पक्ष म्हणून आम्ही शुभेच्छा दिल्या
आम्ही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली आहे. हे ईव्हीएम सरकार आहे, ईव्हीएमवर संशय आहे तो आहे. राजकीय पक्ष म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करावं राज्याच्या हिताच्या सूचना आम्ही करु, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी या भेटीनंतर दिलीय.
हेही वाचा