चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी झाला. 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली असून यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. तर मंत्रिमंडळातून अनेक बड्या नेत्यांना डच्चू मिळाल्यानंतर नाराजीचा सूर दिसून येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर उघड नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे तर दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तर आता चंद्रपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पायी यात्रा काढली आहे. 


राज्य मंत्रिमंडळ विस्तारात चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना डावलेले गेल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये खदखद बघायला मिळत आहे. स्वतः मुनगंटीवार यांनी आपण निराश नसून जनसेवा करण्यासाठी सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया दिली. तरीदेखील  कार्यकर्त्यांचा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. पक्षश्रेष्ठींची भेट घेत मुनगंटीवार यांच्या मंत्रिमंडळात समावेशाची आग्रही मागणी करण्यासाठी चंद्रपुरातून भाजप कार्यकर्त्यांनी पायी यात्रा काढली आहे. नागपुरात न्याय न मिळाल्यास हे कार्यकर्ते दिल्लीपर्यंत पायी यात्रा काढणार आहेत. मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यास चंद्रपूर जिल्हा वीस वर्ष मागे जाणार असून विकास पुरुष सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. 


सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मोठी जबाबदारी? 


दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर त्यांचं मंत्रिपद कशामुळे नाकारण्यात आलं? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.  त्यातच सोमवारी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये दीडतास चर्चा झाली असून त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे. पक्षाने त्यांना विशेष जबाबदारी देण्याचे ठरवले आहे. सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे आमच्या पक्षाने काहीतरी विचार करून त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही, असे त्यांनी सांगितले आहे. आता सुधीर मुनगंटीवार यांना नेमकी कुठली जबाबदारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   


आणखी वाचा 


छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली