मुंबई : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटात प्रवेश (UBT Shivsena) करणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपने लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याने ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज दुपारी 12 वाजता उन्मेष पाटील यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश होण्याची शक्यता असल्याची सुत्रांची माहिती आहे.


तिकीट कापलेले भाजप खासदार उन्मेष पाटील शिवबंधन बांधणार?


उन्मेष पाटील यांनी मंगळवारी थेट मुंबईत दाखल होत खासदार संजय राऊतांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्यांची बैठक झाली. त्यामुळे उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे. जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.


उन्मेष पाटील ठाकरे गटात जाणार?


दरम्यान, एकीकडे तिकीट कापलेले भाजप खासदार शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत.


उन्मेष पाटलांवर भाजप आमदाराची प्रतिक्रिया


भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. यावर उत्तर देताना मंगेश चव्हाण म्हणाले, या सगळ्या संदर्भात भाजपचे जेष्ठ नेते प्रतिक्रिया देतील, अजून अधिकृतरित्या कोणताही निर्णय झालेला नाही, अशा वेळी प्रतिक्रिया देणे उचित होणार नाही. या अगोदर देखील अनेक जण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातं होतं, अशी अनेक नाव समोर आहेत. एकदा काय तो निर्णय होऊ द्या, मग काय त्या प्रतिक्रिया देता येतील मात्र उन्मेष पाटील भाजप सोडून जाणार नाही, असं आपल्याला वाटत असल्याचं मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे.


उन्मेष पाटील भाजप सोडून जाणार नाही, मंगेश चव्हाण यांना विश्वास


भाजपा खासदार उन्मेष पाटील हे आज मातोश्रीवर गेले असले, तरी ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार नाहीत, असा विश्वास त्यांचे प्रतिस्पर्धी मानले गेलेलं आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचं तिकीट कापलं गेल्यानंतर उन्मेष पाटील यांनी आपण भाजपमध्येच राहणार असल्याचं म्हटल होते, कदाचित हेच सांगण्यासाठी ते मातोश्रीवर गेले असावेत, अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Unmesh Patil : नाही म्हणताना वेदना होत आहेत, पण...; राऊतांच्या भेटीनंतर नाराज उन्मेश पाटीलांची प्रतिक्रिया