पुणे: वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी रात्री लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी प्रसिद्ध केली. या उमेदवार यादीत 5 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये पुण्यातून मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. वसंत मोरे (Vasant More) यांच्या रुपाने वंचितने पुणे लोकसभेच्या रिंगणात तगडा उमेदवार रिंगणात उतरवल्याची चर्चा आहे. वंचितकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. यावेळी वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या मुंबईतील 'राजगृह' या निवासस्थानी घडलेला एक किस्सा सांगितला.
वसंत मोरे हे साधारण आठ दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांना भेटण्यासाठी मुंबईतील त्यांच्या घरी गेले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीवर सुजात आंबेडकरही वसंत मोरे यांना भेटले होते. सुजात आंबेडकर हे त्यादिवशी फक्त वसंत मोरे यांना भेटण्यासाठी अकोल्याहून तातडीने मुंबईत आले होते. याविषयी सांगताना वसंत मोरे यांनी म्हटले की, मी प्रकाश आंबेडकर यांच्या घरी गेलो होतो तेव्हा आमच्यात तासभराची प्रदीर्घ चर्चा झाली. त्या चर्चेत प्रकाश आंबेडकर यांनी मला राजकारणाचे कंगोरे समजवून सांगितले. माझ्याशी ते तासभर पुणे शहराच्या संपूर्ण कामाविषयी बोलत होते. ही चर्चा संपल्यानंतर मी बाहेर पडलो तेव्हा मला सुजात आंबेडकर भेटले. ते मला पाहून म्हणाले की, मी आज अकोल्यात होतो. मी अकोल्याहून रस्तेमार्गे छत्रपती संभाजीनगरला आणि तेथून विमानाने मुंबईला फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे. यानंतर सुजात आंबेडकर यांनी उच्चारलेली वाक्यं माझ्या 15 वर्षांच्या कामाचा गौरव करणारी होती. सुजात आंबेडकर यांनी म्हणाले की, तात्या मी पुणेकर आहे, पुण्यात माझी दोन मतं आहेत. माझं भाग्य आहे की, ही दोन मतं तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला देता येतील. सुजात आंबेडकर यांची ही दोन वाक्यं ऐकून मी भरुन पावलो, असे वसंत मोरे यांनी म्हटले.
वंचितच्या तिसऱ्या उमेदवारी यादीत कोणती नावे?
वंचित बहुजन आघाडीच्या तिसऱ्या लोकसभा उमेदवारीच्या यादीत एकूण 5 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्येही उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. नांदेडमधून वंचितने अविनाश भोसीकर (लिंगायत), परभणीतून बाबासाहेब उगले (मराठा), औरंगाबादमधून अफसर खान (मुस्लीम), पुण्यातून वसंत मोरे (मराठा) आणि शिरुरमधून मंगलदास बांदल (मराठा) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आणखी वाचा