मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असताना राजकारणात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर तिकीट कापलेल्या उमेदवारांमध्ये नाराजीचं वातावरण असून राजीनाम्यांचं सत्र सुरु असल्याचं दिसून येत आहे. भाजपचे विद्यमान खासदार नाराज असल्याची चर्चा आहे. जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी खासदार संजय राऊतांची भेट घेतली. यामुळे उन्मेश पाटील लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
उन्मेश पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी देत उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं. भाजपने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उन्मेश पाटील लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत असताना मंगळवारी उन्मेश पाटील यांनी थेट मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे लवकरच उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असून त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.
नाराज भाजप खासदार ठाकरे गटाच्या वाटेवर
उन्मेश पाटील यांनी संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देत सांगितलं की, मैत्रिपूर्ण भेट होती. मी लवकरच यावर सविस्तरपणे बोलेन. आता काही बोलणे उचित नाही. संजय राऊत आणि आम्ही संसदेत एकत्र काम केलं आहे. राजकारणाच्या पलिकडे मैत्री जपावी लागते. आमची नेहमी चर्चा होत असते. प्रत्येक गोष्टीकडे राजकारण म्हणून बघू नका, असं उन्मेश पाटलांनी स्पष्ट केलं आहे.
वेदना होत आहेत, पण : उन्मेश पाटील
उन्मेश पाटील संजय राऊतांच्या भांडुप येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आपल्या सर्वांचा मी मनापासून आदर करतो. आपले सगळे प्रश्न, आपल्या मनातील सगळे प्रश्न यावर मी सविस्तर आपल्याशी बोलेन. आता मला असं वाटतं की, मी आज बोलणं उचित नाही. तुम्हाला नाही म्हणताना वेदना होत आहेत. त्यामुळे मी आपल्यासोबत वेगळा संवाद साधेन. उद्या सकाळी यावर सविस्तर बोलेन, असं उन्मेश पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
राजकारणाच्या पलिकडे मैत्री जपली पाहिजे
मी आणि राऊत साहेबांनी संसदेच्या सभागृहात सोबत काम केलं आहे. राऊत साहेबांसोबत कायम चर्चा होत असते. त्या निमित्ताने मी आज संवाद साधण्यासाठी आलो आहे, प्रत्येक गोष्टीकडे आपण राजकारणाच्या दृष्टीने बघू नका. राजकारणाच्या पलिकडे मैत्री जपली पाहिजे, ती जपली जात नाही. राजकारणा पलिकडील मैत्री जपण्याचा हा प्रयत्न आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :