उस्मानाबाद : धाराशिव तुळजापूरचे भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांना भर स्टेजवर रडू कोसळले. हुंदके देत आमदार पाटील यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली .त्याच झालं असं की तुळजापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षण महर्षी सी. ना आलुरे गुरुजी (S N Alure Guruji) यांचे नाव देण्यात आलंय. या नामकारणांचा सोहळा तुळजापूर मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आलूरे गुरुजी यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पाटील आणि आलूरे गुरुजी या दोन कुटुंबांचे पिढ्यान पिढ्या संबंध होते. त्यांच्या आठवणीने आमदार राणा जगजित सिंह पाटील यांना भर स्टेजवर रडू कोसळले.आमदार राणा पाटील हुंदके देऊन रडले. प्रयत्न करूनही त्यांना रडू आवरत नव्हतं. त्यानंतर त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या घटनेनंतर मात्र कार्यक्रम स्थळी कमालीची शांतता पसरली होती.
कोण आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. ना आलुरे गुरुजी?
तुळजापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षण महर्षी सी. ना आलुरे गुरुजी यांचे नाव देण्यात आलंय. दरम्यान, 2 ऑगस्ट 2021 रोजी तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सि.ना.आलुरे गुरूजी यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यावेळी ते 90 वर्षांचे होते. 1980 साली ते काँग्रेसचे तुळजापूरचे आमदार होते. तर 6 सप्टेंबर 1932 रोजी आलुरे गुरुजी यांचा जन्म झाला होता. बीडच्या पाटोदा तालुक्यात त्यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम सुरु केले. त्यानंतर ते अणदूरच्या जवाहर विद्यालयात रुजू होऊन तिथूनच ते मुख्याध्यापक म्हणून 1990 साली निवृत्त झाले. शिक्षण प्रसारक मंडळामार्फत आलुरे गुरुजी यांनी अणदूर व त्याच्या ग्रामीण परिसरात विविध गावांत 28 शाळा सुरु केल्यात.
25 टक्के पगार गरीब, मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी
शिक्षकाची नोकरी लागल्यापासून 25 टक्के पगार ते गरीब आणि मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी देत. शिक्षक व आमदार म्हणून मिळणाऱ्या पेन्शनची रक्कमही त्यांनी दलित मुलांसाठीच दिली. मागासवर्गीय आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतीगृहे सुरु करुन शिक्षण उपलब्ध करुन दिले. तुळजाभवानी साखर कारखान्याचे ते माजी अध्यक्षही होते. महात्मा गांधी, साने गुरुजी, विनोबा भावे यांच्या विचाराने ते प्रभावीत होते. मराठवाड्याचे साने गुरुजी अशीही त्यांची ओळख होती. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’ अभियानात ते सहभागी होते. तुळजापूरला अभियांत्रिक कॉलेज उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ओळख होती. शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मधुकर चव्हाण यांच्यासोबत त्यांचे राजकीय काम सुरु होते. शासनाच्या अनेक समित्यांवरही त्यांच्या नियुक्त्या होत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते त्यांचा मोठा गौरवही झाला होता. मराठवाड्यातला दुष्काळ असो वा राष्ट्रीय आपत्ती असो. आलुरे गुरुजी आणि त्यांच्या शाळेची आपदग्रस्तांना मदत ठरलेली असे.
काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळख
सिद्रामप्पा आलुरे हे 1980 मध्ये काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार झाले. त्यांनी शेकापचे तत्कालीन आमदार माणिकराव खपले यांचा 14 हजार 579 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता. 1980 च्या निवडणुकीत त्यावेळी आलुरे याना 34 हजार 121 तर खपले यांना 19 हजार 542 मते पडली होती. 1985 ला मात्र शेकापचे माणिकराव खपले पुन्हा एकदा निवडून आले होते. त्यांनी आलुरे यांचा 11 हजार 230 मतांनी पराभव केला होता. 1985 साली शेकापचे खपले यांना 42 हजार 553 तर काँग्रेसचे आलुरे यांना 31 हजार 323 मते मिळाली होती.
हे ही वाचा