बीड : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून लोकसभा निवडणुकांतील यशाचा आधार घेत व अपयशाला पाठीशी टाकत राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यातच थेट सामना होणार असल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याला विधानसभेचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 30 जागांवर विजय मिळवणारी महाविकास आघाडी तर 17 जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतीमध्ये लढाई आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही पूर्णतः निकालात न निघाल्याने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, लोकसभा निवडणुकांची मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील इम्पॅक्ट दिसून आलाय. त्यात, बीड (Beed) लोकसभा मतदारसंघात बीडचा खासदार बदलण्यातही मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरला. त्यामुळे, आता बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघात काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे. बीड जिल्ह्यावर पहिल्यापासून दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा दबदबा राहिला आहे, त्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde)धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे जिल्ह्याचं नेतृत्व आल्याचं पाहायला मिळालं. 


लोकसभा बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी झाले, त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर, भाजपनं विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना संधी दिलीय. त्यामुळे त्या विधानपरिषदेवर आमदार बनल्या आहेत. तर, परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे हेच उमेदवार आहेत. यावेळी, त्यांना पंकजा मुंडेंची देखील साथ असल्यामुळे त्यांच्या विजयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यासह, बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातील राजकीय गणित काय, कोणता पक्ष आणि नेता बाजी मारणार याचीही चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे राज्यात महायुती व महाआघाडी अस्तित्वात आल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे, महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा, व उमेदवार कोण याचीही उत्सुकता होती. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे सध्या एकच आमदार आहेत. तर, अजित पवार यांच्या पक्षाकडे तीन आमदार असून भाजपकडे 2 आमदारांचं संख्याबळ आहे. सध्यातरी येथे दोन्ही शिवसेना व काँग्रेसला जागा सुटण्याची शक्यता नाही. 


बीडमध्ये 2019 ला राष्ट्रवादीचं वर्चस्व  


महाराष्ट्रातील गत विधानसभा निवडणुका सप्टेंबर 2019 ला जाहीर झाल्या होत्या. तर, मतदान ऑक्टोबर 2019 मध्ये झालं होतं. बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी हे 6 मतदारसंघ आहेत. या सहापैकी गेवराईमधून भाजपचे लक्ष्मण पवार, केजमधून भाजपा नेत्या नमिता मुंदडा आमदार बनल्या आहेत. भाजपने येथे 2 जागा जिंकल्या. तर,  राष्ट्रवादी काँग्रेसनं माजलगावमधून प्रकाश सोळंके, बीडमधून संदीप क्षीरसागर, परळीतून धनंजय मुंडे आणि आष्टीमधून बाळासाहेब आजबे यांना निवडून आणले आहे. मात्र, राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत.


बीड जिल्ह्यात विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ येतात. 2019 च्या तत्कालीन राजकीय युती व आघाडीच्या स्थितीनुसार लढलेल्या 6 जागांपैकी भाजपनं दोन जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसनं चार जागा जिंकल्या होत्या. त्यात, राज्यात बदललेल्या राजकीय स्थितीनुसार महायुतीकडे आता पाच आमदार आहेत. त्यामध्ये भाजपच्या दोन आणि अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांचा समावेश आहे. तर मविआकडे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे संदीप क्षीरसागर यांच्या रुपानं केवळ एक आमदार आहे. मात्र, 5 आमदारांचे संख्याबळ असतानाही लोकसभेला येथील मतदारसंघात महायुतीच्या पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे.


बीड जिल्ह्यातील आमदारांची यादी 


(228) गेवराई विधानसभा -  लक्ष्मण पवार (भाजप)
229) माजलगाव विधानसभा -  प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी - अजित पवार)
230) बीड विधानसभा -  संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी - शरद पवार)
231) आष्टी विधानसभा -  बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी - अजित पवार)
232) केज विधानसभा -  नमिता मुंदडा (भाजप)
233) परळी विधानसभा -  धनंजय मुंडे (राष्ट्रवादी - अजित पवार)


2019 चे पराभूत उमेदवार 


गेवराई – विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी काँग्रेस) 
माजलगाव – रमेश आडासकर (भाजप)
बीड –जयदत्त  क्षीरसागर (शिवसेना)
आष्टी – भीमराव धोंडे (भाजप)
केज –  पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी काँग्रेस)
परळी – पंकजा मुंडे (भाजप )


लोकसभा निवडणुकीत काय घडलं?


लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून बजरंग सोनवणे उभे होते. महायुतीकडील आमदारांची संख्या पाहता पंकजा मुंडे यांचं पारडं वरचढ वाटत होतं. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का बसला आणि बजरंग सोनवणे खासदार म्हणून विजयी होत लोकसभेत गेले. पंकजा मुंडे यांना माजलगाव, आष्टी आणि परळी या 3 विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली. तर, बजरंग सोनवणे यांना गेवराई, बीड आणि केज मतदारसंघातून मताधिक्य मिळालं. केज आणि गेवराई  या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असून देखील बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेवराई मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना 39 हजारांची लीड, केजमधून 13 हजारांचे मताधिक्य आणि बीड विधानसभा मतदारसंघातून सोनवणे यांना 61 हजारांचा लीड मिळाला आहे. तर, पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघात तब्बल 74 हजारांचा लीड मिळाला आहे, याशिवाय माजलगाव मतदारसंघात अवघ्या 935 मतांचे मताधिक्य पंकजा मुंडेंना आहे. तसेच, आष्टी मतदारसंघातून पंकजा यांना 32 हजारांचे मताधिक्य आहे. येथील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे 6550 मतांनी विजयी झाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालात मतदारांनी दिलेला कौल पाहता विधानसभा निवडणूक देखील चुरशीची होत आहे. बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट याही निवडणुकीत दिसून येईल.


हेही वाचा