मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्याबाबत विधिमंडळात अपशब्द वापरले. दानवे यांच्या याच शिवराळ भाषेवर आज प्रसाद लाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाची तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ते आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकटेच आंदोलन करत होते. लाड यांच्या या भूमिकेनंतर आजचे विधिमंडळातील कामकाज वादळी ठरण्याची शक्यता आहे.
माझ्या आई-बहिणीचा उच्चार केला हे चुकीचं
"ज्या पद्धतीनं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माझ्या आई-बहिणीचा उच्चार केला हे चुकीचं आहे. विरोधी पक्षनेत्याला हे किती योग्य वाटतं याचा विचार करायला पाहिजे. याबद्दल मला उद्धव ठाकरेंनादेखील विचारायचे आहे. मी स्वत: किती बहादूर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न दानवे यांनी केला. आम्ही सुद्धा लालबाग परळमध्ये मोठे झालो आहोत," अशा भावना लाड यांनी व्यक्त केल्या.
आरोपीला अहंकार असेल तर तो कमी झाला पाहिजे
तसेच "मी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकलंय. विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि माझी माफी मागितली पाहिजे. शिक्षा एक दिवस असेल किंवा एक तासाची असेल. प्रश्न हा आहे की आरोपीला अहंकार असेल तर तो कमी झाला पाहिजे. शिक्षा आणि राजीनामा झालाच पाहिजे. उद्धव ठाकरेंनी देखील यासंदर्भात जाब त्यांना विचारायला पाहिजे," अशी मागणी लाड यांनी केली.
बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का? अंबादास दानवेंची टीका
अंबादास दानवे यांनी 1 जुलै रोजी विधिमंडळात लाड यांना उद्देशून शिवी दिली होती. त्यानंतर त्याच दिवशी दानवे यांनी यावर स्षष्टीकरण दिले होते. बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का? पक्षात धंद्यासाठी हा माणूस काम करतो. माझ्यावर बोट दाखवून बोलतो. सभापतींना बोल मला बोट का दाखवतो? तो कसा मला राजीनामा मागू शकतो? माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील. राहुल गांधींचा विषय विधान परिषदेत का काढला? मला पश्चाताप नाही, माझा शिवसैनिक जागा झाला. माझ्यावर सुद्धा केसेस आहेत. हिंदुत्व साठी केसेस घेतल्या आहेत. हे शेपूट घालून पळणारे हिंदुत्ववादी आहेत, असं दावने म्हणाले.
हेही वाचा :
Ambadas Danve On Prasad Lad : राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन वाद; प्रसाद लाड- अंबादास दानवे भिडले