जालना: येत्या 12 जुलै रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून सोमवारी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून (Beed Lok Sabha) पराभूत झाल्या होत्या. मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे दोन फॅक्टर त्यांच्या पराभवात निर्णायक ठरले होते. मात्र, यानंतर भाजपने पंकजा मुंडे यांना तातडीने विधानपरिषदेवर संधी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमध्यमांशी बोलताना भाष्य केले.


या निर्णयाला वाईट म्हणायचं काम नाही कारण नाही किंवा चांगलं म्हणायचं काम नाही. मी स्वागत केल्याने न केल्याने त्यांना काही फरक पडणार आहे का? पडणार असेल त्यांच्यामध्ये फरक तर आम्ही पंकजा मुंडे यांचं कौतुकच करु. पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याच्या निर्णयामुळे आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही. त्यांनी आणि त्यांच्या समाजाने काय समजून घ्यावं, हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्यावर काही नकारात्मक प्रतिक्रिया देणार नाही. कारण आम्ही काही जातीयवादी नाही. आम्ही त्यांना निवडणुकीत पाडा असेदेखील म्हणालो नव्हतो. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा आमच्या समाजावर काही परिणाम होण्याचं कारण नाही. आम्ही समाज म्हणून एकत्र आहोत आणि एकजुटीने राहणार आहोत. एकजुटीने आम्ही आरक्षणासाठी लढा देणार आणि ओबीसीतूनच आरक्षण मिळवणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.


भाजपकडून तीन ओबीसी नेत्यांना संधी


भाजपकडून विधानपरिषदेसाठी योगेश टिळेकर, पंकजा मुंडे आणि परिणय फुके या तीन ओबीसी नेत्यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बसला होता. मात्र, त्यावेळी ओबीसी समाज एकजूट होऊन आपल्याला तारेल, असा भाजप नेत्यांचा विचार असल्याची चर्चा होती. परंतु, ओबीसी समाजानेही तितकीशी साथ न दिल्याने भाजपला फटका बसला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने भाजपने आपला पारंपरिक मतदार असलेली ओबीसी व्होटबँक भक्कम करण्यासाठी विधानपरिषदेला तीन ओबीसी नेत्यांना संधी दिल्याची चर्चा आहे. 


विधानपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत कोणत्या नावांची घोषणा?


पंकजा मुंडे (भाजप)
परिणय फुके (भाजप) 
सदाभाऊ खोत (भाजप)
अमित गोरखे (भाजप)
योगेश टिळेकर (भाजप)
भावना गवळी (शिंदे गट)
कृपाल तुमाने (शिंदे गट) 
प्रज्ञा सातव (काँग्रेस)
जयंत पाटील (शेकाप)


आणखी वाचा


केंद्रीय नेतृत्वाकडून पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...