बीड:  राज्यसभेच्या ५६ जागांसाठी येत्या २७ तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या  पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे.  राज्यसभेच्या ५६ पैकी सहा जागा या महाराष्ट्रातील आहेत. त्यापैकी तीन जागांवर विजय मिळवण्याइतपत संख्याबळ भाजपकडे आहे. 
त्यामुळे या तीन जागांवर कोणाची वर्णी लागणार, यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या  राजकारणापासून दूर सारल्या गेल्या होत्या.प्रत्येक राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार, अशी चर्चा होते. परंतु, प्रत्यक्षात पंकजा यांना संधी मिळू शकली नव्हती. यावेळीही राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच भाजपमधून पंकजा मुंडे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा लढायची की राज्यसभा हे ठरवण्याची वेळ आला निघून गेलेय, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. 


पंकजा मुंडे भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'लोक अभियान' या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी रविवारी बीड येथील नारायण गडावर जाऊन ठग नारायणाचे दर्शन घेतले. तेथून त्या पोंडूळ गावात गेल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, गेल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही निवडणूक आली की माझ्या नावाची कायम चर्चा होते. तशी चर्चा होणे स्वाभाविक आहे. कारण लोकांना आणि प्रसारमाध्यममांनाही मला एखादी उमेदवारी मिळावी, असे वाटते. त्यामुळेच आता राज्यसभा निवडणुकीच्यानिमित्ताने माझे नाव चर्चेत आले आहे, असे पंकजा यांनी म्हटले. यावर त्यांना तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायला आवडेल की राज्यसभेत जाणे पसंत कराल, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा यांनी म्हटले की, लोकसभा की राज्यसभेवर जायचं हा चॉईस ठरवायला आता फार उशीर झाला आहे. मला कुठे जायला आवडेल, यापेक्षा लोकांना मला कुठे बघायचे आहे, हे महत्त्वाचे असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.



पंकजा मुंडेंबाबत केंद्रीय पार्टी चांगला निर्णय घेईल: देवेंद्र फडणवीस


महाराष्ट्र भाजपकडून नऊ नेत्यांची यादी दिल्लीत पाठवण्यात आल्याची चर्चा आहे.  यामध्ये पंकजा मुंडे, माधव भंडारी, चित्रा वाघ, विजया रहाटकर यांची नावे आघाडीवर आहेत. पंकजांना राज्यसभेवर जाण्याची संधी देणार का, याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली. यावेळी फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया देताना म्हटले की, कोण राज्यसभेत जाईल, कोण जाणार नाही, याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात. पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं की लोकसभेत पाठवायचे किंवा त्यांना कुठलं पद द्यायचे, याचा निर्णय केंद्रीय पार्टी घेईल. मला विश्वास आहे की, केंद्रीय पार्टी चांगला निर्णय घेईल, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.


आणखी वाचा


राज्यसभेबाबत राष्ट्रवादीत खलबतं; कोणाची लागणार वर्णी?