NCP Rajya Sabha Seats : नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षामध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) जागेबाबत अजूनही निश्चिती झाली नसल्याची बाब समोर आली आहे. सध्या पक्षामध्ये वरिष्ठांकडून वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरू आहे. राष्ट्रवादीत सध्या एक गट असा आहे, ज्याचं असं म्हणणं आहे की, ओबीसी समाजाला (OBC Samaj) राज्यसभेसाठी संधी मिळायला हवी. यामध्ये भुजबळ कुटुंबाला राज्यसभेची (Rajya Sabha Election) संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, भुजबळ (Chhagan Bhujbal) कुटुंबाकडून राज्यसभेची जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे अल्पसंख्यांक समाजातील चेहरा राज्यसभेवर जावा, अशी देखील एका गटाची मागणी आहे. 


नुकतेच बाबा सिद्धकी (Baba Siddique) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) आले आहेत. तर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटून आपली राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासोबतच काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना ठाणे जिल्ह्यातील शिष्टमंडळ भेटून गेलं असून आनंद परांजपे यांना राज्यसभेवर पाठवावं, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार यांच्या वतीनं गोविंदराव अधिक यांचे चिरंजीव अविनाश अधिक यांच्यासाठी प्रयत्न होत आहेत. 


प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना राज्यसभेवर पाठवण्यात यावं का? यावर देखील पक्षामध्ये खलबतं सुरू आहेत. जर सुनील तटकरे राज्यसभेवर गेले तर पक्षासाठी त्यांना जास्त वेळ देता येईल, असाही एक प्रवाह पक्षामध्ये आहे. परंतु, कर्जत येथील शिबिरात अजित पवार यांनी महायुतीमधील चार जागांवर क्लेम केला होता. यामध्ये रायगडच्या जागेचा देखील समावेश होता. जर सुनील तटकरे यांना राज्यसभेवर पाठवलं, तर रायगड लोकसभेवरील क्लेम राष्ट्रवादीनं सोडला की काय? अशी चर्चा होऊ शकते. त्यामुळे महायुतीत या जागेबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो? याकडे राष्ट्रवादी लक्ष ठेवून आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राज्यसभेसाठी कोणाला संधी देण्यात यावी, याबाबत अद्याप निर्णय झाला नसून हा निर्णय पुढील दोन दिवसात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेसाठी अर्ज भरण्यासाठी 15 फेब्रुवारी ही अंतिम तारीख आहे. 


राज्यसभेसाठी महायुतीतही चढाओढ 


राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच, आता सर्वच पक्षाच्या हालचाली देखील वाढू लागल्या आहेत. महायुतीनं तशी तयारी देखील सुरू केली असून, पाच जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचा निर्धार महायुतीनं केला आहे. निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आणि सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात सहा जागा रिक्त होत असून, भाजप (BJP), शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे. भाजपनं तर त्यांच्या तीन उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली असून, यामध्ये आघाडीवर विनोद तावडे यांचं नाव असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. आता केंद्रीय नेतृत्व लवकरच नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याचं भाजपच्या गोटातून समजतंय. 


महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची संख्या :


भाजप : 104
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 42 
शिवसेना (एकनाथ शिंदे गट): 40
काँग्रेस : 45
शिवसेना उद्धव ठाकरे गट : 16 
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 11
बहुजन विकास आघाडी : 3 
समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी 2
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी 1 आणि अपक्ष 13