मुंबई : महाराष्ट्र भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा ट्वीट केलेला व्हिडीओ हा डीलिट करण्यात आलाय. महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल, अशा आशयाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ भाजपकडून शेअर केला होता. त्यानंतर तासाभरासाठी राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाकडून हे ट्वीट डीलिट करण्यात आले. पण या सगळ्यामुळे भाजप पुन्हा एकदा नव्या राजकीय भूकंपाची पेरणी तर करत नाही, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. 


दरम्यान राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पण एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आणि सगळ्या चर्चांना पुर्णविराम लागला. पण आता पुन्हा एकदा जवळपास वर्षभरानंतर पुन्हा एकदा या चर्चा सुरु झल्यात. 


भाजपकडून स्पष्टीकरण


'महाराष्ट्र भाजपकडून देवेंद्र फडणवीसांची कविता असलेला व्हिडीओ ट्वीट झाला होता. पण या व्हिडीओचा अर्थ इतकाच की यामुळे कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते.यामधून कोणताही राजकीय अर्थ काढण्याचा आणि राजकारण करण्याचा प्रयत्न करुन नये. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करेल असं याआधीच देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे त्याचप्रकारे काम केलं जात आहे', असं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलं आहे. 


हा व्हिडीओ अनेकदा पोस्ट करण्यात आलाय - केशव उपाध्ये 


महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी म्हटलं की, 'हा व्हिडीओ सोशल मीडिया  मर्यादित आहे. जनादेश यात्रेतील हा व्हिडीओ आता पर्यत अनेकदा टाकला गेला आहे. त्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते.या आधीच माननीय देवेंद्रजीनीच स्पष्ट केले आहे की,एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढविल्या जातील. त्यामुळे कुणीही वेगळा अर्थ काढू नये.'


महाराष्ट्र भाजपकडून हा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागेल. पंरतु महायुतीच्या नेत्यांनी मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तर विरोधकांकडून मात्र नेतृत्वाचा चेहरा बदलणार या चर्चांवर जोर दिला गेला. पण महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का हे येणारा काळच ठरवेल. 


हेही वाचा : 


Devendra Fadanvis : फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपने ट्वीट केलेल्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण