छत्रपती संभाजीनगर : शहरात पुढील महिन्यात होणाऱ्या अध्यात्मिक गुरु धिरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर 'बाबां'च्या (Bageshwar Dham)कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून (Andhashraddha Nirmulan Samiti) विरोध करण्यात येत आहे. तसेच चमत्कारिक दावा करणाऱ्या बागेश्वर बाबां'च्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील अंनिसकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजक केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड आणि छत्रपती संभाजीनगर यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून निवेदन देण्यात आले आहे. 


06 ते 08 नोव्हेंबर या कालावधीत अध्यात्मिक गुरु बागेश्वर बाबा यांचा शहरात कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाची मोठमोठे फ्लेक्स शहरात लागलेले आहेत. या कार्यक्रमाच्या संयोजानामध्ये केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड हेही असल्याचे दिसून येत आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या अयोध्या नगरी मैदानात हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी जोरदार तयारी देखील करण्यात येत आहे. तब्बल 100 एकर परिसरावरती भव्य मंडप आणि किमान दहा लाख नागरिकांना भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहेत. तसेच, तीन दिवस भरगच्च कार्यक्रम असून या तीन दिवसांमध्ये बाबांचा दरबार भरणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या आधीच बागेश्वर बाबा यांच्या दरबाराला धश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला आहे. 


अंनिसचे पोलिसांना निवेदन... 


महाराष्ट्र अंनिसच्या संभाजीनगर शाखेच्या वतीने पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "धिरेंद्र कृष्ण शास्त्री, (बागेश्वर धाम, मध्य प्रदेश) हे अध्यात्माच्या नावाने करीत असलेले चमत्कारांचे दावे, फलज्योतिषाचा प्रचार, प्रसार, स्वत:कडे कोणतीही वैद्यक शास्त्राची पदवी नसताना लोकांच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींवर उपाय सांगणे, छ्द्मविज्ञानाचा वापर हे सर्व भंपक प्रकार भारतीय संविधानात प्रत्येक भारतीय नागरिकांचे मुलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोन या मूल्याशी पूर्णपणे विसंगत आहेत. शिवाय आतापर्यंत त्यांनी अध्यात्माच्या नावाने मोठमोठ्या जनसमुहासमोर जेही कार्यक्रम देशात ठिकठिकाणी केलेले आहेत ते प्रसारमाध्यमांत यु ट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यांचही सखोल तपासणी करावी. तसेच त्यांच्यावर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी."


व्हिडीओ शुटींग करून कायदेशीर कारवाई करावी...


बागेश्वर बाबा यांच्या अशास्त्रीय दाव्यांमुळे जादूटोणा विरोधी कायदा तसेच फसवणुकीविरूधी कायदा, ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमिडीज (आक्षेपार्ह जाहिराती) अॅक्ट 1954, मेडिकल प्रॅक्टीशनर अॅक्ट अशा कायद्यातिक कलमांचा भंग होतो. असे महाराष्ट्र अंनिसचे म्हणणे असून त्यानुसार त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, तसेच असा चमत्कारिक दाव्यांचा कार्यक्रम होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे. तसेच, राजकीय दबावापोटी जर कार्यक्रम झालाच तर, त्या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग करावे. ते तपासून त्यानंतर सदर कायद्यानुसार धिरेंद्र शास्त्री बाबावर कायदेशीर कारवाई करावी  असेही निवेदनात म्हटले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Bageshwar Dham : वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या 'बागेश्वर बाबां'चा संभाजीनगरात दरबार भरणार