मुंबई : 'महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल', अशा आशयाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadanvis) व्हिडीओ भाजपकडून शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असणारे देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार का या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आलंय. त्यामुळे भाजपच्या या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात दावे प्रतिदाव्यांचा संगम सुरु झालाय.
दरम्यान राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पण एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आणि सगळ्या चर्चांना पुर्णविराम लागला. पण आता पुन्हा एकदा जवळपास वर्षभरानंतर पुन्हा एकदा या चर्चा सुरु झल्यात.
फडणवीस पुन्हा कधीही परत येऊ शकत नाही - सुषमा अंधारे
दरम्यान भाजपने ट्वीट केलेल्या या व्हिडीओवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पुन्हा कधीही येऊ शकणार नाही. संपूर्ण भाजपला सध्या फडणवीसांच्या हो ला हो करावं लागेल. त्यामुळे ते असं काहीतरी करतात', असं म्हणत सुषमा अंधारेंनी भाजपवर हल्लाबोल केला.
प्रवीण दरेकरांनी काय म्हटलं?
हा व्हिडीओ महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन ट्वीट करण्यात आला. पंरतु याबद्दल काहीच कल्पना नसल्याचं म्हणत प्रवीण दरेकांनी म्हटलं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'भाजपचा कार्यकर्ता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आम्हाला आनंद देणारं असेल. पण फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं आहे की, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र काम करणार आहोत. त्यामुळे कोणत्याही जर तर च्या प्रश्नांना काहीच अर्थ नाही. तसेच हा जुना व्हिडीओ का पुन्हा ट्वीट कऱण्यात आला याबद्दल देखील लवकरच स्पष्टोवक्ती केली जाईल.'
हो, ते पुन्हा आलेत - उदय सामंत
'याआधी देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की मी पुन्हा येईल, ते पुन्हा आलेत. सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील घेऊन आलेत. पण या व्हिडीओवर योग्य स्पष्टीकरण हे भाजपचं देईल. पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीच निवडणुका होतील', असं उदय सामंतांनी म्हटलं.
एकनाथ शिंदेंच्या नेृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका लढवणार नाही - पृथ्वीराज चव्हाण
'काल पंतप्रधान मोदी यांचा महाराष्ट्र दौरा झाला, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवारी केली. त्यामुळे त्या बैठकीमध्ये कदाचित नेतृत्व बदलण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजप लोकसभेच्या निवडणुका लढवण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कदाचित या नेतृत्वाचा चेहरा बदलला जाऊ शकतो. त्यासाठी सुरुवात भाजपकडून करण्यात आलीये'. असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.
यामुळे आम्हाला कोणतीही अस्वस्थता नाही - अनिल पाटील (अजित पवार गट)
'आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्था नाही. जे काही आहे पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चा करतील. आम्ही देखील पुन्हा येऊ, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करु. त्यामुळे या व्हिडीओवर आम्हाला कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही', असं अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील म्हणालेत.