मुंबई: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले असतानाच भाजपच्या गोटात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. मुंबईत शुक्रवारी संध्याकाळी ओबीसी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या बहुचर्चित बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील प्रदेश भाजप कोअर कमिटीच्या (BJP Core Committee) बैठकीला पोहोचले. ही बैठक तब्बल पाच तास सुरु होती. रात्री आठ वाजता सुरु झालेली ही बैठक उत्तररात्री एक वाजेपर्यंत रंगली. या बैठकीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.


विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा


भाजप कोअर कमिटीच्या या बैठकीत पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. विधानपरिषद निवडणुकीसाठी कोअर कमिटीकडून 10 नावं निश्चित करुन ती यादी दिल्लीत केंद्रीय नेतृ्त्त्वाकडे पाठवली जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतील फायद्याच गणित लक्षात घेऊन विधानपरिषदेसाठी उमेदवार निश्चित केले जातील. संबंधित उमेदवाराचा विधानसभा क्षेत्रात किती प्रभाव आहे किंवा त्याला संधी दिल्यास विधानसभा निवडणुकीत  जातीय आणि राजकीय समीकरणे कशाप्रकारे साधली जातील,  हे मुद्दे विचारात घेण्यात आले आहेत. या सगळ्याची साधकबाधक चर्चा करुन भाजप कोअर कमिटीकडून विधानपरिषद निवडणुकीसाठीची 10 उमेदवारांची नावे दिल्लीत पाठवली जातील, असे सांगितले जाते. 


विधानसभा निवडणुकीची ब्लू प्रिंट, उत्तररात्रीपर्यंत रंगलेली बैठक


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप खासदारांची संख्या 23 वरुन थेट 9 पर्यंत खाली घसरली होती. याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजपचे नेते अंग झटकून कामाला लागले आहेत. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील रणनीतीबाबत प्राथमिक चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एक ब्लू प्रिंट तयार केली जाणार आहे. या ब्लू प्रिंटच्या आधारे विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची निवड, प्रचार आणि रणनीती या गोष्टी निश्चित होतील. यासंदर्भात कोअर कमिटीची आणखी एक बैठक होणार असून त्यानंतर प्राथमिक ब्लू प्रिंट निश्चित होईल. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर या निवासस्थानी प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्यासह कोअर कमिटीतील सदस्य उपस्थित होते. ही बैठक रात्री आठ वाजता सुरु झाली होती आणि रात्री एक वाजता संपली. 


आणखी वाचा


विधानपरिषदेसाठी निष्ठावंतांना संधी द्या, भाजप पदाधिकाऱ्याचं थेट खासदार अशोक चव्हाणांना पत्र