मुंबई : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांनी आज मुंबईतील शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी, लोकसभा निवडणुकीत मनसेनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोहोळ यांनी राज ठाकरेंचे (Raj Thackeray) आभार मानले. राज ठाकरे यांना पुण्याबद्दल विशेष प्रेम आहे, लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी भविष्यातील पुणे (Pune) कसं असावं यासंदर्भात जाहीर सभेत भाषण करुन काही अपेक्षाही नेतेमंडळींकडून व्यक्त केल्या होत्या. त्यामुळेच, निवडणूक निकालानंतर मुरलीधर मोहोळ यांनी आज राज ठाकरेंची भेट घेऊन पुण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मोहोळ यांच्याकडे असल्याने त्यांच्या खात्याविषयी चर्चा केली. राज ठाकरेंनी मला मार्गदर्शन केले, असे स्वत: मोहोळ यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या ठराविक उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यामध्ये, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे आणि पुणे या ठिकाणी सभा घेत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं होत. पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरेंनी पुणे शहराचं वाढतं विस्तारीकरण आणि नागरी समस्यांवर भाष्य करताना पुणे शहराचं व्यवस्थित मॅनेजमेंट आणि सौंदर्यीकरण झालं पाहिजे, अशी भूमिका घेतली. आपल्या भाषणावेळी त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना जवळ बोलवून त्यांना विजयी करण्याचं आवाहनही पुणेकरांना केलं होतं. त्यानंतर, लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच खासदारकीची माळ गळ्यात पडलेल्या मुरलीधर मोहोळ यांना केंद्रातील मोदी 3.0 सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मोहोळ यांच्या रुपाने पुणेकरांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळालं आहे. केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आज मुरलीधर मोहोळ यांनी शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, अभिनेता रमेश परदेशी हाही सोबत होता.
पिट्याभाईनेही वेधलं लक्ष
मुळशी पॅटर्नमध्ये पिट्या भाईची भूमिका साकार करणारे अभिनेते रमेश परदेशी हेही मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत राज ठाकरेंच्या भेटीला होते. त्यामुळे, फोटो फ्रेममध्ये पिट्याभाईनेही शिवतीर्थवरील राजभेटीत अनेकांचा लक्ष वेधले.
विधानसभेलाही हेच चित्र दिसेल
लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता, आता विधानसभेला अजून वेळ आहे. मात्र, विधानसभेतील महायुतीबाबत वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर चर्चा होईल, हे सर्व विषय त्यांच्याकडचे आहेत. असं असलं तरी विधानसभेलाही लोकसभेप्रमाणेच चित्र पाहायला मिळेल, असे म्हणत विधानसभेलाही मनसे महायुतीसोबतच राहिले, असे संकेत मोहोळ यांनी दिले आहेत.
पहिल्यांदाच खासदार अन् थेट मंत्री
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळाल्याने ही मोठी संधी मानली जाते. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला होता. महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढवणे आणि मराठा समाजातील नेत्यास संधी देणे ही भूमिका ठेऊन पहिल्यांदा खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली आहेत. लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची चांगली कामगिरी झाली. त्यामुळे त्या ठिकाणी भाजप भक्कम करण्याची जबाबदारी मोहोळ यांना करावी लागणार आहे. त्यामुळेच, भाजपने मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये मोठी संधी दिल्याचे बोलले जाते.