मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी करणे शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भोवण्याची शक्यता आहे. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission) संजय राऊतांची तक्रार केली असून त्या संबंधित भाषणाची सीडीही आयोगाला सादर केली आहे. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 123 (4) चा भंग तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार भाजपने केली आहे. 


राऊतांनी माफी मागावी


बुलढाण्यातील एका सभेत बोलताना संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हे वक्तव्य केल्याने उद्धव ठाकरेदेखील या गुन्ह्यातील भागिदार असल्याचं भाजपने म्हटलं आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना तत्काळ पंतप्रधानांची माफी मागण्याचे निर्देश द्यावेत, तसेच संजय राऊत यांच्यावर तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी पत्रातून निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या या पत्रावर अश्विनी वैष्णव, ओम पाठक, विनोद तावडे, संजय मयुख यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. 


लोकप्रतिनिधीत्व कायद्याचं उल्लंघन


संजय राऊतांनी हे वक्तव्य करून लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम 125 चे उल्लंघन केलं असल्याचा आरोपही या पत्रात ठेवण्यात आला आहे. हे कलम दोन समाजात द्वेषाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याशी संबंधित असून त्यासाठी 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. तसेच भाजपकडून करण्यात आलेल्या या तक्रारीत भादंविच्या 153 अ, 153 ब, 499 या कलमाचाही उल्लेख आहे. 


सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध केंद्र सरकार, दिनकरन विरुद्ध सीटी पब्लिक, अभिरामसिंग विरुद्ध सीडी कोम्माचेन इत्यादी सुप्रीम कोर्टाच्या खटल्यांतील निकालांचा या पत्रात दाखला देण्यात आला असून त्यातील निकालाच्या आधारे संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. 


काय म्हणाले होते संजय राऊत? 


बुलढाण्यातील सभेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, महाराष्ट्रात छत्रपती शिवराय जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूच्या दाहोद नावाच्या गावात औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीवरून महाराष्ट्रावर चाल करुन येत आहे. दोघांची विचारसरणी सारखीच आहे.


संजय राऊतांना मोदींचे प्रत्युत्तर 


संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमचे सरकार आपल्या दहा वर्षांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड ठेवत आहे. आम्ही पुढील 25 वर्षांचा रोडमॅप बनवत आहोत. आमच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांचा आराखडाही तयार करत आहोत. दुसरीकडे आमचे विरोधक आहेत, ते नवनवीन विक्रमही करत आहे. आज त्यांनीच 104 व्यांदा मोदींना शिवी दिली. औरंगजेब म्हणून मला सन्मानित केलं.


ही बातमी वाचा: