Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. बीडमधून प्रीतम मुंडे आग्रही असताना भाजपने पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आले आहे. तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या मैदानात असतील.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी (BJP candidate list) जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत.
प्रीतम मुंडेंचा पत्ता कट, भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी
भाजपनं बीड लोकसभा मतदारसंघात प्रीतम मुंडे यांना उमेदवारी नाकारली आहे. मात्र त्यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. बीडच्या जागेवर प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवावी, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. त्यामुळेच भाजपच्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. अखेर भाजपने पंकजा मुडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या मातब्बर नेत्या आहेत. प्रीतम मुंडे यांच्या पेक्षा पंकजा मुंडे गेल्या काही काळात अधिक पसंती मिळत असल्याने भाजप पक्षाश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आता रंगली आहे.
पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते लोकसभेचे संकेत
येत्या चार दिवसांत आचारसहिंता लागेल, त्यामुळे आता काय काळजी घ्यावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काळजी लोकसभेची घ्या, मग पुढची काळजी आम्ही घेऊ, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. अशातच आता त्यांचं नाव जाहीर झालं आहे.
पुण्यातून मुरलीधर मोहोळ रिंगणात
तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जगदीश मुळीक (Jagdish Mulik) आणि मुरलीधर मोहोळ यांची नावं चर्चेत होती . निवडणुकीच्या आधीच मेधा कुलकर्णींना राज्यसभेच्या खासदार बनवून हक्काचा ब्राह्मण मतदार नाराज होणार नाही याची भाजपने काळजी घेतली आहे. मुरलीधर मोहोळ यांचा दांडगा जनसंपर्क आहे आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या सक्रिय सहभाग होता. या निवडणुकीदरम्यान अनेक नेत्यांनी मतदार संघाचे दौरे केले. केंद्रीय मंत्री अमित शहांनीदेखील यांनीदेखील मतदार संघाचा दौरा केला होता. या सगळ्या दरम्यान मुरलीधर मोहोळ सक्रीयपणे सहभागी होते. त्यासोबतच पुणे आणि आजुबाजूच्या गावांमध्येही भाजपची ताकद आहे, त्यामुळे भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
पुणे लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार अशी चर्चा सुरू होती. मला खात्री आहे पुणे लोकसभामधून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देईन की लोकसभा उमेदवार म्हणून मला संधी दिली. देशाचे प्रधानमंत्री, अमित शाहजी, जे पी नड्डाजी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारी आहे.
व्यक्ती म्हणून माझं नाव आलं असलं तरी पक्ष सर्व सामान्य कार्यकर्त्याला नेता करतो. १९९२-९३ साली अध्यक्ष होतो. लोक प्रतिनिधी म्हणून काम केलं. महापौर म्हणून काम केलं, राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता लोकसभा उमेदवार होतो हे फक्त भाजपमध्येच होऊ शकते, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले. सांस्कृतिक जडणघडण, शहराचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून काम करणार. मोदींनी केलेलं काम, स्वप्नात असलेली मेट्रो सुरू झाली, चांदणी चौक प्रकल्प अनेक गोष्टी भाजपकडून मिळाल्या. पुन्हा एकदा खासदार हा पुण्याचा महायुतीचा, त्याला मत देईन, मोदीजी यांना पुन्हा प्रधानमंत्री करणार, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा