जेजुरी: अजितदादा गटाने बारामतीचा वचपा कल्याणमध्ये काढायचा ठरवले आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना दगाफटका केला तर माझ्याकडे त्यासाठी प्लॅन तयार असल्याचे वक्तव्य विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केले.बारामतीच्या एका जागेवरुन शिंदे गटाला मिळणाऱ्या जागांवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. याविषयी शिवतारे यांनी विचारले असता त्यांनी म्हटले की, गेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने लोकसभेच्या (Loksabha Election 2024) 23 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 18 खासदार निवडून आले. तर 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. पण आता शिवसेनेची अवस्था काय आहे, असा प्रतिसवाल शिवतारे यांनी केला. ते बुधवारी जेजुरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


यावेळी विजय शिवतारे यांना बारामतीत अजित पवारांना सहकार्य न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात कोंडी करु शकते, याविषयी विचारण्यात आले. त्यावर शिवतारे यांनी म्हटले की, कोणी जर बोलत असेल की, जिथे माझे  शिवसेनेचे खासदार जिकडे उभे आहेत, तिकडे हे लोक अडचण करतील. तर त्यासाठी माझ्याकडे स्ट्रॅटेजी तयार आहे. मी ' सौ सोनार की, एक लोहार की' करुन टाकेन, असे सूचक वक्तव्य शिवतारे यांनी केले.


पवार घराण्यावर शिवतारेंची सडकून टीका


विजय शिवतारे यांनी बुधवारी सकाळी पत्रकारपरिषद घेऊन अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती. दुपारी जेजुरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा हाच राग आळवला. राक्षसाचा वध मार्तंडने केला, त्याच राक्षसी प्रवृत्तीविरोधात मी लढतो आहे. 41 वर्ष पवारांनी सत्ता राबवली, त्यांच्याविरोधात मी लढतो आहे.  माझ्यावर टीका करत आहेत त्यांना मी सांगू सांगू इच्छितो की, इथली स्थानिक समीकरण वेगळी आहेत. आताच्या आता याठिकाणी सर्वेक्षण करावे. येथील जनतेने सुनेत्रा पवारांना मतदान केले नसते. अजित पवारांबाबत येथे नाराजी आहे. त्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना झाला असता. मी माझी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना सांगेन, त्यानंतर ते काहीही बोलणार नाहीत. मी सर्वसामान्य जनतेची भूमिका घेऊन पुढे जात आहे. पण मी आता माघार घेणार नाही. मी आता फार पुढे गेलो आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी माझ्यावर थेट टीका केली तर मी त्यांना प्रत्युत्तर देईन. मी त्यांच्या भाटांना उत्तर देणार नाही, असे विजय शिवतारे यांनी म्हटले.


आणखी वाचा


देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार..., विजय शिवतारे काय काय म्हणाले?