Nitesh Rane : अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. पोलिसांनी तपासाचे चक्र अधिक गतिमान करत केलेल्या तपासामुळे अखेर तीन दिवसांनी आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपीचं नाव मोहम्मद शहजाद असून तो बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान याच मुद्यावरून राज्याच्या राजकारणात बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न चर्चेत आला आहे.


यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारत सरकार अपयशी असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे या टीकेला राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी प्रतिउत्तर देत आता मातोश्रीत बांगलादेशी घुसल्यावर जाग येणार आहे का? असा प्रतिप्रश्न केला आहे. तर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरती केली असती, अशी बोचरी टीका ही नितेश राणे यांनी केली आहे.


मुंबई पालिकेतले अधिकारी अन् काही लोकांनी बांगलादेशी पाळलेत - नितेश राणे 


बांगलादेशी आज सैफअली खानच्या घरात घुसले आहेत, उद्या तुमच्या आमच्या घरात घुसतील. त्यामुळे या सापांना ज्यांनी दुध पाजलं त्यांची नावं आमच्याकडे आहेत. आम्ही ही घाण राज्याच्या बाहेर काढणार आहोत. मुंबई पालिकेतले अधिकारी आणि काही लोकं यांनी बांगलादेशी पाळले आहे, त्यांना पण सांगतोय बांग्लादेशात निघून जायची तयारी करा, असा इशारा ही मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. 
मला या प्रकरणी राजकारण करायचं नाही, पण जे बोलत होते की नितेश राणे विष पसरवतोय ते आता कुठे गेले आहेत? लोकसभेला मतदार कोण आहेत यांची यादी आमच्याकडे आहे. यात लोकल सपोर्ट कोण करतंय? कोणी मतदान केलंय यांची माहिती आम्हाला आहे असेही नितेश राणे म्हणाले.


सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर


अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरु होता. यामध्ये पोलिसांच्या हाती आता मोठी माहिती लागली आहे की, आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचे तपासात पुढे आले आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अवैधरित्या भारतात वास्तव्यास होता. तो बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती आता पोलिसांना मिळाली आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपीनं वेशांतर केलं, नाव बदललं आणि तो ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये पोहोचला. या लेबर कॅम्पमधूनच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न चर्चेत आला आहे.  


हे ही वाचा