Ladki Bahini Yojana : राज्यातील 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'तील पात्र लाभार्थी महिलांच्या (Ladki Bahin Yojana) अर्जांची पडताळणी केली जात आहे. सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरल्यानंतर आतापर्यंत मिळालेले पैसे दंडासहित परत करावे लागतील अशी भीती असल्याने राज्यातील अनेक महिला आपला लेखी अर्ज देऊन ‘लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेतून माघार घेत आहेत. आतापर्यंत 4 हजारापेक्षा जास्त महिलांनी योजनेतून माघार घेण्याबाबतचा अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी मोठा खुलासा केला आहे. मात्र, या योजनेचे आधी पैसे मिळालेल्या माहिलांकडून योजनेचा लाभ न मिळण्याबाबचा अर्ज केल्यानंतर त्यांना आत्तापर्यंत मिळालेले पैसे परत करावे लागणार का याबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांनी खुलासा केल्यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाक्याने संभ्रमता निर्माण झाली आहे.(Ladki Bahin Yojana) 


अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार अशी माहिती महिला आणि बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल माध्यमांची बोलताना दिली. अपात्र लाडक्या बहिणींचे जुलैपासून दिलेल्या पैशाचे हप्ते सरकार परत घेणार आहे. सर्व लाडक्या बहिणीच्या पात्र-अपात्रतेच्या अर्जाची छाननी सुरू असल्याचा देखील त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान सर्व लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार नसून ज्या स्वतःहून अर्ज करतील त्यांच्याच पैसे परत घेणार असल्याचं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे, त्यामुळे आता संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती आहे. 


आदिती तटकरे काय म्हणाल्या? 


आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र आढळल्यास त्या लाडक्या बहिणींना त्याची माहिती देऊ. आत्ता ज्याप्रमाणे साडेचार हजार लाडक्या बहिणी पुढे आलेले आहेत. त्या स्वतःहून शासनाकडे पैसे रिटर्न करत आहेत. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्या संदर्भातला संपूर्ण डेटा ज्याप्रमाणे आम्हाला मिळत जाईल त्याप्रमाणे त्यांना या संदर्भातली माहिती दिली जाईल. आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये त्या पद्धतीने तो पैसा जमा केला जाईल. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेणार असल्याचे वक्तव्य आदिती तटकरे यांनी केला आहे. 


हसन मुश्रीफ काय म्हणाले?


मंत्री हसन मुश्रीफ यासंदर्भात बोलताना म्हणाले, यापूर्वी आम्ही अनेक वेळा खंडन केलेलं आहे. आम्ही जे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना द्यायचे ठरवले. त्यावेळी जो जीआर काढलेला आहे त्या जीआर मध्ये ज्या अटी होत्या, त्याची फक्त अंमलबजावणी केली जाईल. परंतु या योजनेतून ज्या अपात्र ठरतील त्यांच्या पैसे काही परत मागितले जाणार नाहीत. आता स्वतःहून महिला पुढे येऊन म्हणत आहेत. आम्ही या योजनेत बसत नाही त्यामुळे पैसे परत घ्या. 


अनेक महिला अशा आहेत, ज्या पैसे परत देणार नाहीत अशी शक्यता आहे, पत्रकाराच्या या प्रश्नावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, त्यांच्याकडून पैसे परत घेणार नाहीत. ज्या महिला अपात्र ठरल्या त्या महिलांकडून पैसे वसुली केली जाणार नाही. एकाच पक्षातील या दोन नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे आता पैसे परत घेतले जाणार की नाही याबाबतची चर्चा रंगली आहे. मात्र महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे परत घेतले जातील.