मुंबई: लोकसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत होण्याची चिन्हं असलेल्या माढा (Madha Lok Sabha) आणि सोलापूर मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ भाजपने (BJP) जिंकले होते. यंदा भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या रुपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळाल्याने भाजप या दोन्ही मतदारसंघांमध्ये सहज बाजी मारेल, असे चित्र होते. परंतु, शरद पवार यांनी मोहिते-पाटील घराण्याला (Mohite Patil Family) आपल्या बाजूला वळवल्याने माढा आणि सोलापूरमधील राजकीय समीकरण 180 अंशाच्या कोनात फिरले आहे. सुरुवातीला भाजपसाठी सहजसोपी वाटणारी ही लढाई आता अवघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर माढा आणि सोलापूर मतदारसंघात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या खास मर्जीतील दोन शिलेदारांना पाठवण्यात आले. 


यापैकी माढ्यात आमदार प्रसाद लाड आणि सोलापूरमध्ये श्रीकांत भारतीय यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  हे दोन्ही नेते 7 मेपर्यंत मतदारसंघात तळ ठोकून प्रचार आणि रणनीती आखण्याची सूत्रे हलवतील. त्यामुळे आता माढा आणि सोलापूरमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. माढ्यात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत आहे. तर सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यात लढाई होणार आहे. 


भाजपकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती


रायगड - प्रवीण दरेकर


रत्नागिरी सिंधदुर्ग - रविंद्र चव्हाण


धाराशिव - अजित गोपछडे 


लातूर - प्रताप पाटील चिखलीकर 


बारामती - मेधा कुलकर्णी


कोल्हापूर - धनंजय महाडिक


हातकणंगले - डॉ. अनिल बोंडे


सांगली - भागवत कराड


सातारा - विक्रांत पाटील


माढा - प्रसाद लाड


सोलापूर - श्रीकांत भारतीय


माढ्यात बड्या नेत्यांच्या सभा


माढ्यात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी पंतप्रधान मोदी हे सभा घेणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस हेदेखील रविवारी एकाच दिवसात माढा, सांगोला, अकलूज येथे तीन सभा घेणार आहेत. 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. तर गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या पट्ट्यात सभा घेऊन वातावरणनिर्मिती केली आहे. त्यामुळे माढा आणि सोलापूरमध्ये पुढील काही दिवस राजकीय गरमागरमी होताना दिसेल.


आणखी वाचा


भाजप 400 पार नाही पण 'इतक्या' जागा जिंकणार, माढा-बारामतीत कोण बाजी मारणार? माढ्यातील कापड व्यापाऱ्याचं भाकीत समोर