कोल्हापूर: छत्रपती घराण्याचा मान कसा ठेवायचा, हे आम्हाला कोणीही शिकवू नये. संभाजीराजे छत्रपती यांचा मान आम्हीच ठेवला आहे. काँग्रेसच्या नेत्याने पराभव समोर दिसत असल्याने लोकसभा उमेदवारीची आपल्या गळ्यातील माळ शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या गळ्यात घातली. काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचं काम केलं आहे, असा आरोप शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी केला. ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील, सुषमा अंधारे आणि कोल्हापूरच्या राजघराण्यावर सडकून टीका केली.


सतेज पाटील घाणेरडे राजकारण करत असतील तर कोल्हापूरची जनता माफ करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला आले म्हणून त्यांचा जळफळाट का होतोय? ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी सभा घेतात त्याठिकाणी उमेदवार निवडून येतात, असा दावा यावेळी राजेश क्षीरसागर यांनी केला.


शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले: राजेश क्षीरसागर


छत्रपती घराण्याचा मान कसा ठेवायचा हे आम्हाला शिकवू नये. संभाजीराजे छत्रपती यांचा मान आम्हीच ठेवला आहे. शाहू महाराजांनी राजकारणात पडू नये, असे आम्हाला वाटत होते. छत्रपती पद हेच सर्वात मोठं पद आहे. मात्र, आता शाहू महाराजा एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यामुळे राजकारणात आरोप-प्रत्यारोप होणार. शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे. छत्रपती घराण्याचे खरे वारसदार कोण? असा प्रश्न केला जातो. कदमबांडे यांची देखील चर्चा याठिकाणी केली जाते. छत्रपती घराण्याने राजकारणात पडू नये म्हणून याआधी मालोजीराजे आणि संभाजीराजे यांचा कोल्हापूरकरांनी पराभव केला होता. या निवडणुकीत गादीचा अपमान होणार आहे आणि हे करणाऱ्या काँग्रेसला जनता माफ करणार नाही, असे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले.


एमआयएम पक्षाची कोल्हापूरमध्ये एकही शाखा नाही. कोण आहेत हे एमआयएमवाले? ते पुन्हा कोल्हापूरमध्ये आले तर आम्ही त्यांना फोडून काढू. आम्हीदेखील हिंदू आहोत. सुषमा अंधारे हे फालतू, पेड बाई आहे, अशी टीकाही क्षीरसागर यांनी केली.


कोल्हापूरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, कोणावर टीकेची तोफ डागणार?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापूरमध्ये जाहीर सभा होत आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी ही सभा होत असून या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. साधारण चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूरमध्ये दाखल होतील. त्यानंतर तपोवन मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणावर टीकेची तोफ डागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


आणखी वाचा


शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?