ABP Majha Sting Operation Impact : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) कापसाच्या बियाणाची वाढीव दराने विक्री होत असल्याचे समोर आले होते. तर या प्रकरणी 'एबीपी माझा'ने स्टिंग ऑपरेशन करून हा सर्व प्रकार महाराष्ट्रासमोर आणले होते. दरम्यान 'एबीपी माझा'ने बातमी दाखवताच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याची तत्काळ दखल घेतली आहे. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी आम्ही राज्यात नव्याने कायदा आणणार असल्याचे सांगितले आहे. सोबतच वाढीव दराने बियाणे विकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सत्तार यांनी दिली आहे.
दरम्यान, यावर बोलताना सत्तार म्हणाले की, लवकरच आम्ही एक कायदा करत अहोत. ज्यात राज्यात बोगस बियाणे विकणारे यांच्यावर कारवाई करणार आहोत. एक कायदा तयार करण्याचा देखील आमचा प्रस्ताव आहे. किमान 1 वर्ष जामीन मिळू नये अशी तरतूद असेल आणि 10 वर्षाची शिक्षा होईल असा हा कायदा असणार आहे. तसेच राज्यात बोगस बियाणे विकणाऱ्यांवर आणि वाढीव दराने विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग आणि पोलीस या तिघांचे एकत्रीकरण करून पथक तयार करण्यात आले असल्याचे देखील सत्तार म्हणाले आहेत.
काय आहे प्रकरण?
राज्यात बोगस बियाणे आणि वाढीव दराने त्याची विक्री करणाऱ्या लोकांविरोधात धाडसत्र सुरू आहे. तर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या लोकांना सोडणार नाही अशी भूमिका कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केली आहे. मात्र त्याच अब्दुल सत्तारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत साडेआठशे रुपायाची कापसाची बॅग साडेबाराशेपासून तर 2300 रुपयांपर्यंत विकली जात आहे. हा सर्व प्रकार 'एबीपी माझा'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात हा सर्व प्रकार सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधी यांनी पैठण तालुक्यातील पैठण शहर, पाचोड, आडूळ, बिडकीन या गावात जाऊन स्टिंग ऑपरेशन केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला आहे.
अशी सुरु आहे लुटमार?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सद्या पेरणीच्या तोंडावर कृषी सेवा केंद्र चालकांकडून बियाणे वाढीव दरात विकले जात आहे. काही मोजक्या कंपन्याच्या बियाणे महागड्या दरात विकल्या जात आहे. विशेष म्हणजे शासनाने कापसाच्या बियाणेच्या बॅगेचे दर 853 निश्चित केले आहे. असे असताना काही कृषी सेवा केंद्र चालक मात्र कापसाची बॅग साडेबाराशे ते 2300 रुपयांपर्यंत विकत आहे. तसेच यासोबत इतर बियाणे घेणं देखील बंधनकारक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :