P Chidambaram Health: माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम  (P Chidambaram)  यांच्या बरगडीत फ्रॅक्चर झाल्याची बातमी समोर येत आहे. दिल्लीत आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली, ज्यामुळे त्यांच्या डाव्या बरगडीला फ्रॅक्चर झाला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक व्हिडीओ जारी करून म्हटले आहे की, "दिवसभर काँग्रेस नेत्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. खासदार शक्तीसिंह गोहिल यांच्यावर हल्ला झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.''


सुरजेवाला म्हणाले की, ''मोदी सरकारने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना पोलिसांनी मारहाण केली, चष्मा जमिनीवर फेकण्यात आला, त्यांच्या डाव्या बरगडीला हेअर लाईन फ्रॅक्चर (Hair Line Fracture) झाला आहे. खासदार प्रमोद तिवारी यांना धक्काबुकी करण्यात आली. डोक्याला दुखापत झाली असून बरगडीत फ्रॅक्चर आहे.” ते म्हणाले, “ही लोकशाही आहे का? निषेध करणे गुन्हा आहे का?''




याबाबत माहिती देताना पी चिदंबरम यांनी ट्वीट केले की, "जेव्हा तीन मोठे आणि कठोर पोलिस तुमच्याशी टक्कर घेतात, तेव्हा तुम्ही भाग्यवान असता की, तुम्ही हेअर लाईन क्रॅकशी वाचलात. डॉक्टरांनी सांगितले आहे की, हेअर लाईन क्रॅक असल्यास ते 10 दिवसात स्वतःच बरे होईल. मी ठीक आहे असून मी उद्या माझ्या कामावर जाईन.''


दरम्यान, आज ईडीने राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी बोलले होते. या विरोधात देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शन केली. तर दिल्लीत ही काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आंदोलन केले.