Aurangabad News: पेट्रोलच्या वाढत्या दराने सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशात जर तुम्हाला कुणी अर्ध्या किमतीत पेट्रोल मिळत असल्याचं सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र  औरंगाबादमध्ये उद्या अवघ्या 54 रुपयात एक लिटर पेट्रोल मिळणार आहे.  विशेष म्हणजे हे पेट्रोल मनसेकडून मिळणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


राज ठाकरे यांचा उद्या 54  वा वाढदिवस आहे. त्यामुळे 54 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 54 रुपये लिटरने पेट्रोल देण्याचा निर्णय मनसे घेतला असल्याच मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले आहे. सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान शहरातील क्रांती चौका पेट्रोल पंपावर प्रत्येकी 1 लिटर पेट्रोल 54 रुपये लिटरने दिले जाणार असल्याच खांबेकर म्हणाले. त्यामुळे उद्या कमी किमतीत पेट्रोल घेण्यासाठी मोठी गर्दी होण्याची सुद्धा शक्यता आहे. 


राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन


"वाढदिवसाला कुणीही भेटायला येऊ नका, जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या" असे  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) वाढदिवसानिमित्त  मनसैनिकांना आवाहन केले आहे. सोशल मीडियावर एक ऑडिओ  पोस्ट करत राज ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे. आपल्या ऑडियो पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले, "14 तारखेला भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलते आहे. मध्यल्या काळात रुग्णालयात दाखल झालो पण कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने शस्त्रक्रिया रद्द झाली.  आता ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडणार आहे. आता पुन्हा तोच प्रकार नको  म्हणून यावेळी वाढदिवशी  कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या", असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. 


अयोध्या दौरा स्थगित


राज ठाकरे 15 दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होते. हे दुखणं वाढल्यामुळे त्यांनी पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले. यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचं जाहीर केलं. येत्या 5 जून रोजी राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अयोध्या दौऱ्याला जाणार होते. त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली. परंतु पायाचं दुखणं अधिकच वाढल्याने डॉक्टरांनी शस्त्रकियेचा सल्ला दिला. परिणामी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.