भिवंडी : भिवंडी लोकसभेत (Bhiwandi Lok Sabha) तब्बल दहा वर्ष खासदार असलेले केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024 Results) दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर भाजपसह (BJP) महायुतीतील (Mahayuti) कार्यकर्त्यांमध्ये मरगळ पसरली असतानाच माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संपूर्ण लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणाऱ्या जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या जनसंवाद यात्रेचे शुभारंभ केला.  जनसंवाद यात्रा भिवंडी शहरासोबतच भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड या विधानसभा क्षेत्रात जाणार असून तेथील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्याचे नव्याने जोश देण्याचे काम या जनसंवाद यात्रेतून केले जाणार असल्याची प्रतिक्रिया कपिल पाटील यांनी दिली आहे. 


नेत्यापेक्षा कार्यकर्त्यांची ताकद मोठी


या वेळी बोलताना कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा क्षेत्रात अपयश का आलं, हे भिवंडी शहरातील सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे. कार्यकर्त्यांची ताकद कशी असते, हे मुरबाड विधानसभेतील कार्यकर्त्यांनी दाखवून दिली आहे. एवढा विरोध असताना त्या ठिकाणी आपण 28 हजारांची आघाडी घेतली. यामध्ये फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांची ताकद दिसून येत आहे. त्यामुळे नेत्यापेक्षा कार्यकर्त्यांची ताकद मोठी असते हे सिद्ध झालेलं आहे. यापूर्वी आपण भिवंडी शहरात दुर्लक्ष केलं, हे मान्य करीत यापुढे पूर्ण लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 


प्रत्येक वार्डात भाजपची ताकद वाढविणार


पूर्वी येथील कार्यकर्त्यांना जेवढी ताकद देतो, त्याच्या दहा पटीने कार्यकर्त्यांना ताकद देऊन दोन्ही विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक वार्डात आणि भारतीय जनता पार्टीची ताकद वाढविणार आहे. पुन्हा भाजपाचे सरकार आणायचा आहे. त्यासाठी दोन्ही आमदार आपल्याला निवडून आणायचे आहेत. देशांमध्ये जो फॅक्टर चालला, तोच फॅक्टर महाराष्ट्रात चालला. त्या व्यतिरिक्त मुस्लिम, दलित, आदिवासी आणि मराठा हा फॅक्टर चालला, पण आपल्याकडे चालला तो स्वकीयांचा विरोध हा होता. आपल्या घरातले घरभेदी हा फॅक्टर सुद्धा चालला, असे कोणत्याही स्वपक्षातील विरोधकाचे नाव न घेता आरोप केला आहे.


कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असतं, तर पराभव झाला नसता


जर ही विधानसभा आपल्याला जिंकायची असेल तर जसा त्यांनी फॅक्टर उभा केला, तसा फॅक्टर आपल्याला उभा करावा लागेल, असे कार्यकर्त्यांना आव्हान करीत, कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असतं, तर आपला पराभव झाला नसता. आपल्याला अस्तीनच्या सापापासून सावध राहायचं आहे. तसेच, 4 जूनपर्यंत झालेल्या आमच्या कामांचा श्रेय जर कोणी घेत असेल तर, त्याला उत्तर देण्यासाठी पुढे या, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. तर दुसरीकडे 4 जूननंतर तुम्ही काम करा आणि त्याचं श्रेय तुम्ही घ्या, त्याला आमचा विरोध नसेल, असं वक्तव्य कपिल पाटील यांनी केलं आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.