मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला पराभवाचा मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला आहे. विशेष म्हणेज सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील हेही अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर महायुती व 30 जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळाला असून विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळाला. स्पष्ट बहुमताचं सरकार असतानाही भाजपने अजित पवारांना (Ajit Pawar) महायुतीत घेतल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता. आता, निवडणूक निकालानंतरही पुन्हा तो विषय समोर आला आहे. संघाच्या मासिकातून भापवर निशाणा साधण्यात आला.  त्यावर, आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ  240  जागा मिळाल्या, याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांचा अति आत्मविश्वास असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकात करण्यात आलीय. संघाचे स्वयंसेवक रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे. महाराष्ट्रात अजित पवारांसोबत हातमिळवणी आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपला झटका बसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप आणि शिदेंकडे आवश्यक बहुमत असूनही अजित पवारांशी हातमिळवणी का केली, असा सवालही रतन शारदा यांनी लेखातून विचारला आहे. त्याच अनुषंगाने छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी स्पष्टपणे कुबली दिल्याचं पाहायला मिळालं. 


अजित पवारांना सोबत घेतल्यामुळेच भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला, अशी टीका संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकातून करण्यात आली?, असा प्रश्न छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, उत्तर देताना होय अशी कबुलीच भुजबळ यांनी दिली. ''त्यांनी अनेकांनी टीका केलेली आहे. काही लोकांनी तर काँग्रेसचे लोकं घेतल्यामुळेही टीका केलीय. काँग्रेसचे अशोक चव्हाण घेतले आहेत, मिलिंद देवरा घेतले आहेत, त्यांना राज्यसभेवरही पाठवलंय. आम्हाला देखील सोबत घेतलंय, ते म्हणतात ते एकंदरीत बरोबर आहे,'' असं आश्चर्यकारक उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं. तसेच, पण मला त्यांना असं म्हणायचंय, तुम्ही हे महाराष्ट्रातलं सांगता. मग, भारतातील इतर ठिकाणी काय झालंय, इतर ठिकाणीही सेटबॅक बसलेला आहे. त्यामुळे, नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांना सोबत घेऊन आघाडी करावी लागली, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले. 


80 ते 90 जागा द्यायच्यात त्या द्याव्यात


आमच्या महायुतीतील पक्षांनीही एकत्र येऊन काय तो जागावाटपाचा निर्णय घेतला पाहिजे. काय 80-90 ज्या जागा द्यायच्यात त्या द्याव्यात, असे म्हणत पुन्हा एकदा भुजबळांनी महायुतीच्या जागावाटपावर मत व्यक्त केलंय. दरम्यान, यापूर्वीही छगन भुजबळ यांनी जाहीर सभेतून महायुतीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकसमान जागा वाटप करावे, अशी मागणी केली होती, त्यांचे ते विधानही चांगलेच चर्चेत होते.