Ahmednagar Lok Sabha Election : अहमदनगर लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून निलेश लंके (Nilesh Lanke) यांची उमेदवारी जाहीर झाली. यासाठी निलेश लंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटातून राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटात आले. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार, जयंत पाटील आणि इतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेते उपस्थित होते. पण शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) उपस्थित नव्हते हे विशेष. त्यांनी निलेश लंके यांचे शरद पवार गटात आल्यानंतर जोरकसपणे स्वागत केलेलं पाहायला मिळालं नाही. त्यामुळे रोहित पवार यांच्या मनात नेमकं काय आहे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.


अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर त्यांचे कट्टर राजकीय विरोधक निलेश लंके हे शरद पवार गटातून उमेदवारी घेतील हे स्पष्ट झाले. निलेश लंके लिखित "मी अनुभवलेला कोविड" या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातच त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश होईल असं म्हटलं जात होतं. मात्र त्यांचा प्रवेश काही झाला नाही.


रोहित पवारांची उपस्थिती नाही, प्रतिक्रियाही नाही


नंतर जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत शरद पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आणि इतर नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. पण राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे मात्र त्या पत्रकार परिषदेत दिसले नाही. पुढे निलेश लंके यांनी सुपा येथे कार्यकर्ता मेळाव्यात आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचे जाहीर केले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पक्ष चिन्ह "तुतारी" त्यांनी हाती घेतली.त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेकांनी त्याचे स्वागत केले. पुढे नगर दक्षिण लोकसभेसाठी निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर झाली. पण आमदार रोहित पवारांकडून त्यावर म्हणावी तशी प्रतिक्रिया आली नाही.


राम शिंदेंशी जवळीकता, रोहित पवारांचा दुरावा


मधल्या काळात निलेश लंके आणि कर्जत-जामखेडचे भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्यात वाढलेली जवळीक तसेच राम शिंदे यांनी निलेश लंके यांच्यात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणे यामुळे रोहित पवार हे निलेश लंके यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा रंगत आहेत.


निलेश लंके यांच्या मोहटा गडाच्या पायथ्याशी झालेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमाला रोहित पवार अनुपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी रात्री निलेश लंके यांची भेट घेतली. त्यांनी त्यांनी जोरकसपणे निलेश लंके यांचे स्वागत केलेलं दिसत नाही.


मविआच्या उमेदवाराचा समन्वय नसल्याची टीका


नगर दक्षिण लोकसभेसाठी मविआचा एकही उमेदवार निवडणूक लढवायला तयार नव्हता. प्रधानमंत्र्यांचा झंजावत पाहता मविआला महायुतीतूनच उमेदवार आयात करावा लागला अशी टीका भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांनी केली. महायुतीतून आयात केलेल्या उमेदवाराचा इतरांशी समन्वय आहे की नाही हा प्रश्नच आहे असं सुजय विखेंनी म्हटलं आहे.


महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी मविआत काय चाललं आहे ते अजून काही पाहिलेलं नाही, महाविकास आघाडीत नेमकी कोण माणसं आहेत तेही तपासावं लागेल असा टोला लगावला.


दरम्यान, या सर्व चर्चा घडवून आणून लोकांच्या मनात काहीजण विष पेरत आहेत, रोहित पवार हे राष्ट्रवादीचे नेतृत्व असलेल्या शरद पवारांच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्यावर केवळ जिल्ह्याची नाही तर राज्याची जबाबदारी आहे असं निलेश लंके यांनी म्हटले आहे.


ही बातमी वाचा: