Bhaskar Jadhav : उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena UBT) आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार, अशी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यातच गुरुवारी (दि. 23) मुंबईमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वबळाबाबत संकेत दिले आहेत.  सगळ्यांचे मत आहे की एकटे लढा. तुमची तयारी झाली आहे याची खात्री पटल्यानंतर मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेईन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या संकेतावरून महायुतीच्या नेत्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय. आता यावरून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी महायुतीला खोचक टोला लगावला आहे. 


भास्कर जाधव म्हणाले की, बाळसाहेब ठाकरे यांनी अनेक संकटे उधळून लावली. संकटांना नेस्तनाबूत करून त्यांनी शिवसेना उभी केली. त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवली असे विरोधकांना वाटत असेल, पण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि त्यांचे विचार सर्व शिवसैनिकांच्या नसात भिनवूया असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे त्यांनी म्हटले. 


भास्कर जाधवांचा खोचक टोला


भास्कर जाधव पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता?  ज्या भाजपचे सरकार राज्यात आहे. त्या भाजपने त्यांच्या मित्राला धक्का देऊन स्वबळाची तयारी केली होती. थोडे आमदार कमी पडले, नाहीतर मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते, असा टोला त्यांनी महायुतीला लगावला. तसेच शिवसेना वाढली पाहिजे, असे शिवसैनिकांना वाटत असल्याचे देखील भास्कर जाधव यांनी सांगितले. 


त्यांना ही सणसणीत चपराक


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. याबाबत विचारले असता भास्कर जाधव म्हणाले की,  ज्या पद्धतीने नाटकीय आव आणला होता. महिलांची एकमेव रक्षणकर्ती आणि रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असे त्या वागत होत्या. त्यांना ही सणसणीत चपराक आहे, अशी टीका त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली.  


सामंतांवर मी काही बोलत नाही


शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार, 10 माजी आमदार आणि काँग्रेसचे 5 आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटत प्रवेश करतील, असा मोठा दावा केलाय. याबाबत विचारले असता उदय सामंत काय बोलतात रामदास कदम काय बोलतात यावर मी काही बोलत नाही, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.  


आणखी वाचा 


Shivsena UBT: 'म्हणून शिवसेनेच्या मेळाव्याला अनुपस्थित होतो'; आमदार पळवापळवीची चर्चा रंगली असताना ठाकरेंच्या ज्येष्ठ आमदाराकडून खुलासा!