रायगड: लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच रायगडमध्ये आता वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे सुपुत्र लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात (Raigad Lok Sabha constituency) उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले (Vikas Gogawale) यांचे 'भावी खासदार' अशा आशयाचे पोस्टर्स झळकताना दिसताहेत. मंत्रीपद न मिळालेल्या गोगावलेंनी आता लोकसभेच्या जागेवर दावा केल्याची चर्चाही आहे.


राज्यातील महायुतीमध्ये जागावाटपावरून सुप्त वाद सुरू असून रायगडमध्येही तसं काहीसं चित्र आहे. या ठिकाणी अजित पवार गटाचे सुनील तटकरे (Sunil Tatkare)  हे खासदार आहेत. त्यामुळे अजित पवारांनी या जागेवर आधीच दावा केलाय. दुसरीकडून शिवसेनेकडून अनंत गिते हे मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यातच आता तिसऱ्या उमेदवाराची भर पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. शिंदे गटाचे भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचे या भागात पोस्टर्स लावण्यात आले आहेत.


मंत्रिपद फिक्स होतं, पण आता दोन वर्षांपासून हुलकावणी


रायगडमध्ये शिंदे गटाचे तीन आमदार असतानाही मंत्रिपद मिळाल नाही. तर नंतर सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना मात्र मंत्रिपद आणि पालकमंत्रिपदही देण्यात आल्याने शिंदे गटात नाराजी होती. 


राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची ज्या ज्या वेळी चर्चा होते त्या त्या वेळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे नाव आघाडीवर असते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भरत गोगावले यांना मंत्रिपद आणि रायगडचं पालकमंत्रिपद मिळणार हे फिक्स असताना ऐनवेळी त्यांना थांबण्यास सांगितलं. तेव्हापासून भरत गोगावले यांना मंत्रिपदाची हुलकावणी सुरूच आहे. 


शिंदे गटाच्या नंतर सत्तेत सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला नऊ मंत्रिपदं देण्यात आल्याने शिंदे गटातील अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी पडलं. त्यामध्ये वाद असलेल्या रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांनी आपल्या मुलीला मंत्री बनवलं. त्यामुळे तटकरे हे कानामागून आले आणि तिखट झाले अशी काहीशी अवस्था गोगावलेंची झाली होती. 


मंत्रिपद नाही तर मग आता लोकसभेवर दावा


आता त्याचे सुपुत्र विकास गोगावले हे रायगड लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातंय. याच उद्देशाने गोगावले यांच्या समर्थकांनी आता महाड शहरासोबतच इतरत्र खुलेआम भावी खासदार म्हणून विकास गोगावलेंच्या नावाने बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे  सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्या वादात आता तिसऱ्या उमेदवाराची भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


विकास गोगावले हे जिल्ह्यात नेहमीच युवासेनेच्या माध्यमातून सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क असल्याचं बोललं जात आहे. आता याच उमेदीने विकास गोगावले यांनी लोकसभेचं बाशिंग बांधण्यास सुरुवात केली आहे का असा सवाल विचारला जात आहे.


ही बातमी वाचा :