(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Gogavale : शिरसाट, गोगावले अन् बालाजी किणीकरांमध्ये होती मंत्रिपदासाठी स्पर्धा; गोगावलेंची मंचावरुन खदखद नंतर सारवासारव
Bharat Gogavale: शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी त्यांना मंत्रिपद मिळणार होतं त्यावेळी आमदारानं राजीनामा देण्याची भूमिका घेतल्याचं सांगितलं.
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील बंडाच्यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या नेत्यांना विविध पदं दिली जात आहेत. ज्या आमदारांना आणि नेत्यांना मंत्रिपद देणं शक्य झालं नाही त्यांना महामंडळ दिली जात आहेत. आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील, संजय शिरसाट यांना विविध महामंडळं देण्यात आली आहेत. संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद देण्यात आलं. रायगडमधील महाडचे आमदार भरत गोगावले हे गेल्या दोन वर्षांपासून मंत्रिपदासाठी इच्छुक होते. त्यांना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. भरत गोगावले यांनी अद्याप एसटी महामंडळाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. मात्र, ते त्यांच्या एका वक्तव्यामुळं चर्चेत आले आहेत. ते म्हणाले ज्यावेळी मला मंत्रिपद मिळणार होतं त्यावेळी एका आमदारानं राजीनामा देतो अशी भूमिका घेतली होती. त्यामुळं साहेबांनी त्याला सिडकोचं चेअरमनपद दिलं, असं म्हणत भरत गोगावले यांनी त्यांचा रोख संजय शिरसाट यांच्याकडे होता हे स्पष्ट झालं.
अंबरनाथमध्ये भरत गोगावले म्हणाले,एक जण बोलला मी बारा वाजता राजीनामा देतो.त्याला समजावून सांगितलं होतं. तू मंत्रिपदाची शपथ घेतली की मी राजीनामा देतो म्हणाला होता . त्यामुळे साहेबांनी त्याला सिडकोचं चेअरमन पद दिल. तो किस्सा लय मोठा आहे, असं भरत गोगावले म्हणाले.
अंबरनाथमध्ये शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. भरत गोगावले यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. संजय शिरसाट, माझ्यात अन् बालाजी किणीकर यांच्यात मंत्रिपदाची स्पर्धा होती. मात्र, आम्ही थांबण्याची भूमिका घेतली. मात्र, मला आणि बालाजी किणीकर यांना सर्वाधिक निधी मिळाल्याचं भरत गोगावले म्हणाले.
बालाजी किणीकर यांना मंत्रिपद देण्याचा विषय आला तेव्हा कोणत्यातरी आमदाराच्या पत्नीनं आत्महत्या करण्याची धमकी दिली होती का असं पत्रकारानं विचारलं असता भरत गोगावले यांनी तो बालाजी यांचा विषय नव्हता माझा होता, असं म्हटलं. प्रत्येकाल मन असतं, त्यानं ते मोकळं केलं आम्ही ते स्वीकारलं आणि थांबलो. मंत्रिपदासाठी तुझं कुटुंब उधवस्त होण्यापेक्षा तुझं कुटुंब वाचू दे, भरतशेठ नाही मंत्री झाला तरी चालेल, अशी भूमिका त्यावेळी घेतल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलं. भरत गोगावले यांनी यानंतर सारवासारव करत पुढच्या सरकारमध्ये दोघेही मंत्री असू म्हटल्याची माहिती आहे.
संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्ष बनवल्यानंतर भरत गोगावले नाराज?
एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांना संधी दिली होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार सिडकोचं चेअरमन पद भरत गोगावलेंनी मागितलं होतं. पण ते त्यांना न देता, शिरसाट यांना दिले आणि एसटी महामंडळ गोगावलेंना दिल्यानं ते नाराज असल्याची माहिती आहे. त्यातूनच अंबरनाथ येथील मेळाव्यामध्ये आपली खदखद त्यांनी बोलून दाखवली असल्याची चर्चा आहे.
इतर बातम्या :