Nana Patole on Balasaheb Thorat: बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे भाजपात स्वागत करू आणि त्यांना काँग्रेसपेक्षा मोठे करू, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेस समोर जनतेच्या प्रश्नाची लढाई ही महत्त्वाची आहे. भाजप करत असलेल्या कुठल्याही राजकारणावर मला बोलायचे नाही. कोणी काय बोलावं आणि कुणाला काय करायचं, हा त्यांचा प्रश्न असून आज जनता महागाई, बेरोजगारी यांना सामोरे जात असून हे प्रश्न सुटले असे वाटत असेल तर, भाजपने सांगून टाकावं, असा उपरोधिक टोला पटोले यांनी भाजपला लगावला.


राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर माझे सध्या लक्ष नाही: नाना पटोले


सत्यजित तांबे म्हणाले होते की, काँग्रेसला गळती लागली असून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. यावर नाना पटोले हे भंडाऱ्यातील साकोली इथं माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर माझे सध्या लक्ष नाही. कुणी काय बोलावे हा त्यांचा भाग आहे. तसेच अदानी यांनी खोटी कागदपत्रं दाखवून पैसे लुटल्याचा आरोपही यावेळी पटोले यांनी केला आहे.


15 तारखेला काँगेसच्या बैठक बैठकीत सर्व बाबींचा उलगडा होणार : नाना पटोले 


विदर्भातील काही आमदार आणि नेतेमंडळी हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टार्गेट करत असून पक्षश्रेष्ठींकडे त्यांची तक्रार करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ''राहुल गांधीजींनी देशभरात भारत जोडो ही पदयात्रा काढली. लोकांचे दुःख समजून घेणं, त्यांचं निवारण करणं, राहुल गांधींनी काढलेले पत्र लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवणे हे काम काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात सुरू आहे. काल आम्ही काँग्रेसचे सर्व नेतेमंडळी पुण्यात एकत्र होतो, या कामावर माझं लक्ष आहे. 15 तारखेला प्रदेश कार्यकारिणीची बैठक आम्ही बोलवलेली असून त्या बैठकीत सर्व बाबींचा उलगडा आणि चर्चा होणार. आगामी निवडणुकीच्या संदर्भातही रणनीती आखणी जाणार आहे.'' 


कसबा आणि चिंचवड जागा महाविकास आघाडीच जिंकेल: नाना पटोले


या देशातील जनतेच्या विरोधातील जे सरकार आहे त्यांना हाकलून लावण्याचा संदेश कसबा मधून काँग्रेस आणि महाविकास आघाडी देणार आहे. कसबा निवडणूक काँग्रेस आणि महाविकास आघाडी बहुमताने जिंकेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तसेच चिंचवड आणि कसबा या दोन्ही ठिकाणी उमेदवारी मागे घेतली जाणार नसल्याचेही सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.