Maharashtra Political News: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat) यांना काही गोष्टींमध्ये विश्वासात घेतलं नाही. पक्षनिष्ठ राहून त्यांनी सदैव काम केलं, त्यामुळे त्यांच्या आताच्या नाराजीचा विचार व्हावा आणि पक्षश्रेष्ठींनी याप्रकरणी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सुधीर तांबे यांनी दिली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिल्ली काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळत आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते सुधीर तांबे (Congress Leader Sudhir Tambe) यांची एबीपी माझानं प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी थोरातांचा हा निर्णय व्यथित करणारा असल्याचंही म्हटलं आहे. 


सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी बोलताना सांगितलं की, "बाळासाहेब थोरातांनी राजीनामा देणं, हे खूप व्यथित करणारं आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या विचारांशी ते एकनिष्ठ आहे, अशा व्यक्तीवर विधीमंडळ पदाचा राजीनामा देण्याची का वेळ यावी? याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. माझी आणि त्यांची यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. "


पक्षश्रेष्ठींनी याची गंभीर दखल घ्यावी : सुधीर तांबे 


बाळासाहेब थोरात यांनी एवढं व्यथित व्हावं, त्याचं कारण नेमकं काय? यावर बोलताना सुधीर तांबे म्हणाले की, "जेव्हा एखादी व्यक्ती त्या पक्षाच्या विचारधारेशी जोडलेली असते. त्यासाठी इतक्या समर्पित भावनेनं काम करते. अशा व्यक्तींना विश्वासात न घेणं हे फार दुर्दैवी आहे. गेल्या काही दिवसांत ज्या घडामोडी घडल्यात, त्या काळात त्यांच्याशी चर्चा होणं, गरजेचं होतं. पण ते झालं नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "काँग्रेसच्या अडचणीच्या काळात नेतृत्त्व दिलं. पक्षाच्या सर्वच कामांमध्ये, कार्यक्रमांमध्ये स्वतःला झोकून दिलं, अशा व्यक्तीवर असा निर्णय घेण्याची वेळ का आली? याची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेण्याची गरज आहे." 


दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळत आहे. यावरुन काँग्रेसमधील अंतर्गत कलह विकोपाला पोहोचला आहे. याबाबत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, बाळासाहेब थोरात आमच्याशी बोलतंच नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, हायकमांड थोरातांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र  थोरात राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. 


बाळासाहेब थोरात आमच्याशी बोलतंच नाहीत : नाना पटोले 


बाबाळासाहेब थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली. बाळासाहेब थोरात यांचा कोणताही राजीनामा आमच्याकडे आलेला नाही. तसंच त्यांनी कोणतंही पत्र दिलेलं नाही आणि बाळासाहेब थोरात आमच्यासोबत बोलतच नाही असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय.


महत्त्वाच्या इतर बातम्या :