Sanjay Shirsat On Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या आव्हानाची खिल्ली शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी उडवली आहे. आदित्य ठाकरेंच्या मानगुटीवर अहंकाराचं भूत बसलं आहे, त्यांच्या या काही सभा सुरू आहेत त्या म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ असल्याचं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय. 


यावेळी बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या मानगुटीवर अहंकाराचं भूत बसलं आहे. त्यांचा अहंकार एवढा वाढला आहे की, आमदार सोडून गेले तरीही तो कमी झाला नाही. सत्ता गेली तरीही अहंकार कमी होत नाही. पक्ष संपत चालला आहे, तरीही अहंकार कमी होत नाही. त्यात संजय राऊत पेट्रोल टाकून आदित्य ठाकरेंचा अहंकार वाढवत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्याला अधिक महत्व देण्याची गरज नाही.


पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी राजकारणाची सुरुवातच दोन चांगल्या कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेवून झाली आहे. वरळी काही आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ नाही. तिथे असलेले सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्या छाताडावर पाय ठेवून आदित्य यांनी राजकारणात पहिली पायरी ठेवली हे ते विसरले. राजकारणात एक निवडणूक लढवली म्हणजे आपण सर्वकाही जिंकलो असे त्यांना वाटत आहे. आम्ही एवढ्या निवडणुका जिंकल्या आहेत, पण आमच्यात कधीही अहंकार आला नाही, असेही शिरसाट म्हणाले. 


ठकरे गटाच्या सभा म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ


संजय शिरसाट म्हणाले की, यांच्या ज्या काही सभा चालल्या आहेत त्या डोंबाऱ्याच खेळ आहे. ते फक्त दोरीवरचे पात्र बदलतात. कधी भास्कर जाधव तर कधी सुषमा अंधारे आणि कधी आदित्य ठाकरे याचं पात्र असते. दोरीवर हे लोकं उड्या मारतात आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या की यांना वाटते आपल्याला लोकं खूप दाद देतात. त्यामुळे हे काही दिवस चालणारं नाटक असून, त्यानंतर बंद पडेल आणि यांना कळेल आपण जमिनीवर राहिले पाहिजे.  


संजय राऊत यांच्यावर टीका... 


संजय राऊत या सगळ्यात पेट्रोल ओतत आहेत. राऊत यात पेट्रोल ओतून आदित्य यांना 'तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' म्हणत आहेत. पण संजय राऊत आदित्य ठाकरे यांना कधी तोंडघशी पाडतील हे आदित्य ठाकरे यांना देखील कळणार नसल्याचं शिरसाट म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा; असा असणार संपूर्ण दौरा