Bhaichung Bhutia Quits Politics : भारतीय फुटबॉट टीमचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने राजकारणाला रामराम केला आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बायचुंग भुतिया याने हा निर्णय घेतला आहे. निवडणुकीचं राजकारण आपलं काम नाही अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे उमेदवार रिक्षल दोरजी भुतिया यांनी बायचुंग भुतियाचा 4,336 मतांनी पराभव केला. 


'राजकारणात हेतू नेहमीच चांगला होता'


विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजकारण आपलं काम नसल्याचं लक्षात आल्याचं बायचुंग भुतिया याने स्पष्ट केलं. सिक्कीमधील क्रीडा आणि पर्यटनाच्या विकासासाठी आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणू शकलो नसल्याचं त्याने खेद व्यक्त केला. तसेच राजकारणात आपला हेतू नेहमी चांगलाच होता, पण यश आलं नाही असंही तो म्हणाला. आतापर्यंत आपल्या समर्थकांनी दिलेल्या सोबतीबद्दल त्यांचे आभार मानले आणि या निर्णयामुळे जर कुणाचे मन दुखावले असेल तर त्यांची माफीही बायचुंग भुतिया याने मागितली. 


स्वतःचा पक्ष स्थापन केला


भारताचा फुटबॉल स्टार अशी ओळख असलेल्या बायचुंग भुतियाने 2018 मध्ये स्वतःचा हमरो सिक्कीम नावाचा पक्ष स्थापन केला होता. गेल्या वर्षी त्याचे SDF पक्षात विलिनीकरण करण्यात आलं. भारताच्या माजी फुटबॉलपटूने पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार म्हणून दोनदा निवडणूक लढवली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दार्जिलिंगमधून आणि 2016 च्या विधानसभा निवडणुकी सिलीगुडीमधून त्याचा पराभव झाला.


त्यानंतर बायचुंग भुतियाने सिक्कीममध्ये हमरो सिक्कीम पक्षाची स्थापना केली. 2019 ची विधानसभा निवडणूक त्याने गंगटोक आणि तुमेन-लिंगी येथून लढवली. परंतु दोन्ही ठिकाणी त्याला पराभवाचा सामना करावा लागला. गंगटोकमधून 2019 च्या पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. आता विधासभा निवडणुकीत पुन्हा एकदा त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 


बायचुंग भुतिया हा भारताचा सर्वाधिक यशस्वी फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. त्याने भारताकडून खेळताना सर्वाधिक गोल केले आहेत. तसेच भुतियाने युरोमधील मोठ्या क्लबकडून फुटबॉल खेळला आहे. फुटबॉलमध्ये यशस्वी झालेल्या बायचुंग भुतियाला राजकारणात मात्र यश मिळालं नाही.