Beed Loksabha : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आता बीडमध्ये नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. भाजपकडून बीडमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता शरद पवार पंकजा मुंडे यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. दोन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेल्या बजरंग सोनावणे यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे बीड लोकसभेसाठी बजरंग सोनावणे (Bajrang Sonwane) आणि विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांची नावे चर्चेत आली आहेत. त्यामुळे बीडमधून बजरंग सोनावणे किंवा विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळू शकते. 


कोण आहेत बजरंग सोनावणे ?


धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग सोनावणे (Bajrang Sonwane) सध्या दोन साखर कारखाने चालवतात. सोनावणे जिल्हा परिषदेच्या राजकारणातून पुढे आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनावणे यांनी 5 लाख 9 हजार मतं मिळवली होती. तर प्रीतम मुंडे यांनी 1 लाख 68 हजार मतांनी विजय मिळवला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवाय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना देखील बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. 


राष्ट्रवादीचे उमेजवार जवळपास निश्चित 


शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नऊ जागांची यादी एबीपी माझाच्या हाती आली आहे. बारामती, माढा, रावेर, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा पवारांकडे या जागांची संभाव्य यादी समोर आली आहे. बारामतीतून सुप्रिया सुळे, माढा मतदारसंघातून महादेव जानकर, साताऱ्यातून श्रीनिवास पाटील किंवा किंवा आमदार बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, शिरुरमधून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पु्न्हा एकदा मैदानात उतरवले जाऊ शकते. 


बीडमध्ये आपला उमेदवार निवडून आणू


 मी काही अपेक्षा ठेवून आलो नाही. माझा विधानसभेचा विषय नाही. लोकसभेला पण तुम्ही जो उमेदवार द्याल त्याचं काम करू आणि बीडमध्ये आपला उमेदवार निवडून आणू. तुम्ही जी जबाबदारी द्याल ती पार पाडू. बीड जिल्ह्यातला खासदार 100 टक्के दिल्लीत जाणार, असं मत बजरंग सोनावणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताना व्यक्त केलं होतं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


बजरंग सोनवणेंनी अजितदादांची साथ सोडली, पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताच पहिला निशाणा धनंजय मुंडेंवर