पुणे : बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar Group) पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) अजितदादांची साथ सोडून शरद पवाराच्या पक्षात बुधवारी सामील झाले आहेत. पवार साहेबांचा निर्णय मान्य करून पक्ष देईल तो उमेदवार विजयी करू असा निर्धार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताच बजरंग सोनवणे यांनी पहिला निशाणा धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) साधला आहे.


सन्मान राखण्यासाठी आज मी तुमच्यासोबत


बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, पवार साहेबाच्या पक्षात प्रवेश होतोय, हे भाग्य आहे. मूळ एनसीपीच्या स्थापनेचा मी कार्यकर्ता आहे. पवार साहेब यांचं मन मोठं आहे म्हणून त्यांनी संधी दिली आहे. माझी एकच विनंती आहे, पवार साहेबांच्या नेत्रृत्वात काम करावं. पाहिजे तो सन्मान मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांचा सन्मान राखण्यासाठी मी आज तुमच्यासोबत आलो आहे.  


बीडमध्ये आपला उमेदवार निवडून आणू


सोनवणे पुढे याआधी तुम्ही मला लोकसभेत जाण्याची संधी दिली. मी काही अपेक्षा ठेवून आलो नाही. माझा विधानसभेचा विषय नाही. लोकसभेला पण तुम्ही जो उमेदवार द्याल त्याचं काम करू आणि बीडमध्ये आपला उमेदवार निवडून आणू. तुम्ही जी जबाबदारी द्याल ती पार पाडू. बीड जिल्ह्यातला खासदार 100 टक्के दिल्लीत जाणार, असा विश्वास सोनवणेंनी व्यक्त केला आहे. 


मला नॉट रीचेबल शिवाय पर्याय नव्हता


बजरंग सोनवणे यांनी काही दिवस नॉट रीचेबल असण्याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं आहे की, मला नॉट रीचेबल शिवाय पर्याय नव्हता, आता मी रीचेबल आहे. कार्यकर्त्यांच्या निर्णयामुळे आपण शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करीत आहोत, असंही सोनवणे यांनी सांगितलं आहे.


धनंजय मुंडेंवर निशाणा


माझ्या जिल्ह्यातील जनतेचं दरडोई उत्पन वाढलं पाहिजे, ही माझी इच्छा आहे. हातवारे करून मला भाषण करता येत नाही, असं म्हणत सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.