बीड : राज्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ (Beed Lok Sabha Seat) होय. बीडमध्ये यंदा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) लोकसभेच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे (Bajarang Sonwane) निवडणूक लढवत आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात लढत होत आहे. बजरंग सोनवणे यांनी निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांना एक प्रश्न विचारला आहे. बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत का पराभव स्वीकारावा लागला होता, असा प्रश्न विचारला आहे.
पंकजा मुंडेंना जनतेनं घरी का बसवलं?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाईच्या घाटनांदूर या ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दोघेही बोलताना सांगतात की आम्ही बीड जिल्ह्याचा विकास केला मग 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना जनतेने घरी का बसवलं याच उत्तर त्यांनी द्यावे, असा प्रश्न बजरंग सोनवणे यांनी केला.
आजी माजी पालकमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे.ताई साहेब तुम्ही एवढा निधी आणलाय म्हणताय तर 2019 ला लोकांनी तुम्हाला का घरी बसवलं, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी केला. परळीतील मतदार शरद पवारांना माणणारा असल्यानं तुम्हाला घरी बसावं लागलं, असं सोनवणे म्हणाले.
परळी मतदारसंघातील लोक हे शरद पवार यांच्या विचाराला मानणारे असून सध्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांच्याही बोलण्याचा कडब्याच्या पेंडीचा आळा ज्या प्रमाणं सुटतो तसा सुटला आहे, त्यामुळे त्यांनी विचार करून बोलावं असे देखील बजरंग सोनवणे म्हणाले.
पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये होत्या का? सोनवणेंचा सवाल
बजरंग सोनवणे यांनी 30 एप्रिलला आष्टी तालुक्यातल्या बीड सांगवी या गावात प्रचार सभा घेतली होती. त्यावेळी बीड सांगवी गावात बजरंग सोनवणे यांचा जंगी स्वागत करण्यात आलं होतं. बजरंग सोनवणे यांनी त्यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर विकासाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली होती. धनंजय मुंडे भाषणातून सांगतात पंकजा मुंडे खासदार झाल्यावर बीड जिल्ह्याचा विकास करतील मग गेल्या दहा वर्ष पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये होत्या का त्यांना विकास का करता आला नाही, अशी टीका बजरंग सोनवणे यांनी केली होती.
बजरंग सोनवणे यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन प्रीतम मुंडे यांच्याबाबत देखील प्रश्न उपस्थित केले होते. प्रीतम मुंडे खासदार असताना त्यांनी धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण आणि मराठा आरक्षणावर सभागृहात एकदाही आवाज उठवला नाही असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी प्रीतम मुंडे यांच्यावर देखील टीका केली होती. धनंजय मुंडे यांच्या भाषणाचा स्तर आता घसरत असल्याचं देखील ते म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
बीडमध्येच जातीपातीचं राजकारण का?; धनुभाऊंचा उद्विग्न सवाल, पंकजांकडूनही खंत
सुभाष भामरेंपेक्षा शोभा बच्छाव अधिक श्रीमंत, धुळ्यातील उमेदवारांकडे किती कोटींची संपत्ती?