Nandesh Umap : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) वातावरणामध्ये अनेक नवे चहरे राजकारणातील आपलं नशीब आजमवू पाहतायत. अनेक कलाकार मंडळीही यंदाच्या लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आता काही टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. त्यातच येत्या 4 जूनला निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यातच आता गायक नंदेश उमपही (Nandesh Umap) लोकसभेच्या रिंगणात उतरला असल्याचं पाहायला मिळतंय.
नंदेशने त्याच्या राजकीय इनिंगला सुरुवात केली असून तो मायावती यांच्या बसपा पक्षाकडून लोकसभेच्या रिंगणात उतरला आहे. दरम्यान नंदेश विक्रोळी म्हणजे मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. याच मतदारसंघातून भाजपकडून मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार संजय दीना पाटील रिंगणात आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
नंदेश उमपने काय म्हटलं?
निवडणूक अर्ज भरल्यानंतर नंदेश उपमची प्रतिक्रियाही समोर आली आहे. त्याने म्हटलं की, 'नव्या इनिंगला सुरूवात झालीय. मनात खूप चांगली भावना आहे.गाणे तर चालू आहेच, पण ही इनिंग लढायला काय हरकत आहे. म्हणून लढतोय. माझा जन्मच विक्रोळीत झालाय. तिथं आमची माणसं आहेत. तसंच सर्वच जातीधर्माची माणसं आहेत. मला लोक ओळखतात. बाबांनी केलेले काम आहे तिथे. म्हणून तेथून लढतोय. तर बसपाने मला लढण्याची ऑफर दिली म्हणून बसपातर्फे लढतोय.'
कलाकारांचा मुद्दा दिल्लीत मांडायचा आहे - नंदेश उपम
पुढे त्याने म्हटलं की, 'बाबासाहेबांची ऊर्जा घ्यायला मी चैत्यभूमीवर आलोय. सर्वांची प्रेरणा घेवून लढतोय. रसिकांनी माझ्या गाण्यावर प्रेम केलंय. ते मला इथंही साथ देतील. कलाकारांचा मुद्दा दिल्लीत मांडायचा आहे. मी लढणार आहे. मी थांबणार नाही. समोरचे लोकही चांगले आहेत.परंतु हमभी किसीसे कम नही.'