अहमदनगर: राज्यातील लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी लढतीपैकी एक असणाऱ्या अहमदनगर मतदारसंघ गेल्या काही काळापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्याविरोधात शरद पवार गटाने निलेश लंके यांना मैदानात उतरवून भाजपसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. या मतदारसंघात शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे यांच्याविषयी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला. या दोघांनीही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांची अलीकडेच भेट घेतली. यावरुन विखे-पाटील पितापुत्र पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 


प्रकाश आंबेडकर यांनी या सभेत वंचित आघाडीवर टीका करणारे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना प्रत्युत्तर दिले. बाळासाहेब थोरात यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे. भाजपचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुजय विखे पाटील हे 28 मे 2023 रोजी रात्री साडेअकरा वाजता तुघलक लेनमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना भेटून आले. ही घटना बाळासाहेब थोरात यांच्यासाठी चांगली आहे, असे मी मानत नाही. दुसरी बाळासाहेबांसाठी धोक्याची घंटा असणारी घटना म्हणजे ९ जून 2023 रोजी दुपारी तीन वाजता खरगे हे सोलापूरहून बंगलोरला गेले. तत्पूर्वी 8 जून 2023 रोजी राधाकृष्ण विखे-पाटील खरगेंना गुप्तपणे भेटले होते. त्यांच्यात काय चर्चा झाली, हे मी सांगत नाही. पण भाजपची माणसं काँग्रेसला जाऊन भेटत आहेत आणि काँग्रेसवाले गाफील राहिले आहेत. मी बाळासाहेब थोरातांना सांगू इच्छितो की, ही परिस्थिती चांगली नाही. आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही स्वत:चा पक्ष वाचवावा. अन्यथा तुमच्या हातातील काँग्रेस पक्ष कधी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हातात जाईल, ते सांगता येत नाही, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी थोरातांना लगावला.


राधाकृष्ण विखे-पाटलांनी उद्योगपतीला माझ्या घरी पाठवले होते: शरद पवार


काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी नगरमधील सभेत एक गौप्यस्फोट केला होता. अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांच्याविरोधात निलेश लंके यांना मैदानात उतरवू नये, यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील प्रयत्नशील होते. मुंबईतील एक उद्योगपती त्यांचा निरोप घेऊन माझ्या घरी आला होता. नगरमध्ये निलेश लंके सोडून कोणालाही उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पाठवल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते.


आणखी वाचा


निलेश लंके पाठांतर करुन माझ्यासारखं फाडफाड इंग्रजी बोलले तर नगरमधून उमेदवारी मागे घेईन: सुजय विखे